BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ ऑक्टो, २०२२

महा ई सेवा केंद्रातही मिळतोय जातीचा बनावट दाखला !

 



शोध न्यूज : बनावट जातीचे दाखले नेहमीच वादग्रस्त ठरत असताना आता शासनमान्य महा ई सेवा केंद्रातही बनावट जातीचे दाखले मिळू लागले असून अशाच प्रकरणात मंगळवेढ्यातील ऑनलाईन सोल्यूशन महा ई सेवा केंद्राच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जातीचे बनावट दाखले सादर केल्यामुळे अनेकांवर कारवाई होत आहे, कित्येकांच्या नोकऱ्या अशा दाखल्यामुळे गेल्या आहेत तर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा दाखला अवैध ठरल्यास त्यांचे पद देखील जात असल्याची अनेक प्रकरणे आहेत. परंतु शासनाने मान्यता दिलेल्या महा ई सेवा केंद्रातूनच असे प्रकार होत असल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उघडकीस आला आहे. संगणक आणि प्रिंटर यांचा वापर करून अर्जदारास चक्क बनावट जातीचा दाखला देण्यात आला आणि त्याची फसवणूक करण्यात आल्याचे एक प्रकरण उघडकीस आल्याने आणखी किती बनावट जातीचे दाखले देण्यात आले आहेत हा तपासाचा विषय बनला आहे. 


मंगळवेढ्यात घडलेल्या या प्रकारची फिर्याद निवासी नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे यांनीच पोलिसात दाखल केली आहे. माधा तालुक्यातील बावी येथील अमृता महादेव चव्हाण यांनी रामोशी जातीचा दाखला मिळविण्यासाठी मंगळवेढा येथील महा ई सेवा केंद्रात अर्ज दिला होता. मंगळवेढा न्यायालयाच्या समोर अजित नामदेव सोळगे याचे महा ई सेवा केंद्र आहे, या केंद्रात चव्हाण यांनी आपला अर्ज सादर केला होता. त्यानुसार त्यांना बारकोड क्र १२८४२२०३११५००५११८४४८  या क्रमांकाने धनगर या जातीचा दाखला वितरीत करण्यात आला होता. यावर तक्रार झाली आणि या तक्रारीची चौकशी करण्यात आली तेंव्हा हा दाखला अमोल येदू कोळी या नावाचा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अमृता चव्हाण यांना चौकशीसाठी मंगळवेढा तहसील कार्यालयात बोलावण्यात आले आणि त्यांची चौकशी केली तेंव्हा ही फसवणूक असल्याचे उघड झाले.


अमृता चव्हाण यांनी आपली फसवणूक झाल्याचा जबाब या चौकशीत दिला आहे. बनावट दाखला देवून आपली फसवणूक केली असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. हा सावळा गोंधळ आणि दाखल्याची भानगड चव्हाट्यावर आली आणि तहसीलदार धाईंजे यांनी महा ई सेवा केंद्राच्या चालकाच्या हेराफेरीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. संगणकाच्या मदतीने फेरफार करून प्रिंटरच्या सहाय्याने तांत्रिक फेरबदल करून बनावट जातीचा दाखला देवून चव्हाण यांची फसवणूक करण्यात आली. (Fake caste certificate is also available in Maha E Seva Kendra) त्यानुसार संबधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. 


महा ई सेवा केंद्र नागरिकांच्या सोईसाठी निर्माण करण्यात आली आहेत परंतु सगळीकडेच या केंद्रात नागरिकांची प्रचंड अडवणूक करण्यात येत असते. त्यात तहसील कार्यालयातील काहींचा हात असतोच. शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जाते शिवाय येथे दर पत्रक देखील दिसून येत नाही. महसूल विभागाचे देखील याकडे सोयीस्कर दुर्लक्ष असतेच शिवाय काही मिलीभगत देखील असल्याच्या तक्रारी असतात त्यामुळे हे सेवा केंद्र केवळ नोटा छापण्याचे केंद्र बनलेले असते. नागरिकांची कुचंबणा होत असली तरी महसूल विभाग अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असते. आता तर चक्क बनावट जातीचे दाखले देखील दिले जाऊ लागल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. 

   

(Shodh News: While fake caste certificates are always controversial, now fake caste certificates have also been received in the government-approved Maha E Seva Kendra and in a similar case, a case has been registered against the driver of the online solution Maha E Seva Kendra in Mangalvedha).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !