BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ ऑक्टो, २०२२

आमदार शहाजीबापू पाटील यांचे घुमजाव .... सांगोल्यातून मीच लढणार !

 


शोध न्यूज : सांगोला विधानसभेची निवडणूक आपणच लढणार असे सांगत आमदार शहाजीबापू यांनी घुमजाव केले आहे त्यामुळे पुन्हा एकदा आमदार पाटील चर्चेत आले आहेत.


शिवसेनेतील बंडानंतर सांगोल्याचे बंडखोर आमदार आज अखेर सतत चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या "काय झाडी, काय डोंगार" ची चर्चा होत राहिली तशी त्यांना 'सोंगाड्या', 'नाच्या' अशा वेगवेगळ्या उपमाही विरोधकांनी दिल्या आहेत. वास्तविक आता 'झाडी, डोंगार' हे पांचट होऊ लागले असून कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो तेंव्हा त्यातील मजा निघून जाते असाच यात देखील अनुभव येताना दिसत आहे. आपल्या तोंडून "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील .. ओक्के" हे वाक्य निघणे आणि ते देशभर गाजणे हा एक दैवी चमत्कार असल्याचे बापूनी म्हटले होते.  शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत कालच केलेले विधान मात्र भलतेच चर्चेत आले आणि विरोधकांनी त्यावर समाचार देखील घेतला आहे. 


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत एक विधान केले होते. 'सांगोला मतदार संघातून चेअरमन अभिजित पाटील यांना आमदार करा आणि मला विधानपरिषदेत पाठवा' अशी जाहीर गळ भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांना घातली होती. आधीच शहाजीबापू पाटील यांना सांगोला मतदार संघातून निवडून येणे जिकीरीचे असते आणि त्यात त्यांनी शिवसेनेतून बंड केल्याने दुखावलेल्यांची संख्या वाढली आहे.  बंड झाल्यापासूनच शहाजीबापू पाटील यापुढे संगोल्यातून निवडून येणार नाहीत असे विरोधक सांगत आहेत आणि तशी तयारीही सुरु झाली आहे.  या पार्श्वभूमीवर आ. पाटील यांचे हे विधान म्हणजे निवडणुकीतून पळ काढल्याचे संकेत आहेत असा अर्थ विरोधकांनी लावलेला आहे. 


विधान परिषदेत पाठवा अशी जाहीर गळ भाजपला घातली गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सांगोल्यातील निवडणूक ही पाटील यांना अवघड जाणार असल्याचे चित्र दिसत असतानाच त्यांनी केलेल्या या विधानाचे पडसाद वेगाने उमटू लागले आहेत. शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेल्या चाळीस आमदारांना आगामी निवडणूक ही जड जाणार असल्याचे सगळीकडेच बोलले जात असताना आ. पाटील यांचे हे विधान अत्यंत अर्थपूर्ण मानले गेले आहे. (MLA Shahajibapu Patil will contest election from Sangola)यात आ. पाटील यांचा धूर्तपणा देखील दिसून आला आहे. त्यांच्या या विधानाचे जोरदार पडसाद उमटू लागताच आता त्यांनी घुमजाव केले असून आपणच ही निवडणूक लढविणार असल्याचा खुलासा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 


"नांदेडमध्ये गेलो की गर्दी, कोकणात गेलो तरी गर्दी, त्यामुळे मला तुमच्यासारखं विधानपरिषेदवर घ्या आणि अभिजितला सांगोल्यात उमेदवारी द्या", असे जाहीरपणे बोलणारे आमदार शहाजीबापू पाटील यांनी एका दिवसातच घुमजाव केले आहे. आपण जे बोललो ते तेवढे गंभीरपणे घेण्याची गरज नाही, संगोल्यातून आपणच विधानसभा निवडणूक लढविणार असून जिंकणार देखील आहे असे सांगून उठलेले वादळ शांत करण्याचा प्रयत्न आ. पाटील  यांनी सुरु केला आहे. त्यांनी आता घुमजाव केले तरीही विरोधकांच्या हाती मात्र कोलीत मिळाले असून आ. शहाजीबापू हे निवडणुकीतून पळ काढू लागले आहेत असा अर्थ घ्यायचा तो घेतला गेला आहे. आ. शहाजीबापू पाटील हे अत्यंत हुशार आणि वक्तृत्व असलेले आमदार आहेत, त्यांच्या तोंडून चुकून काही जाणार नाही यावर अनेकांचा विश्वास आहे. पण काळाच्या विधानावर आज शहाजीबापू पाटील यांना खुलासा करावा लागला आहे आणि आपणच निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे हे मात्र निश्चित !   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !