BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० ऑक्टो, २०२२

अश्लील फोटो बनवून महिलेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न !

 



शोध न्यूज : महिलेच्या फोटोचा गैरवापर करून अश्लील फोटो तयार करून ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूर येथे घडला असून याबाबत सदर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


सोशल मीडिया हे एक उपयोगी माध्यम असले तरी त्याचा अनुचित वापर करणारे देखील वाढू लागले असून समाजमाध्यमावर झालेल्या ओळखीचा गैरफायदा सर्रास घेतला जात असताना महिलांना सोशल मीडिया वापरणे देखील आता अडचणीचे ठरू लागले आहे.  पंढरपूर येथील एक महिलेच्या बाबतीत देखील एक धक्कादायक  प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका अज्ञात व्यक्तीने महिलेच्या फोटोचा गैरवापर करून त्या फोटोला अश्लील स्वरूप देत थेट ब्लॅकमेल करण्याचा धाडसी प्रयत्न केल्याचे हे प्रकरण महिला वर्गांची चिंता वाढविणारे ठरले आहे. 


सोशल मीडियावरून कर्ज देण्याचे आमिष आधी दाखविण्यात आले आणि नंतर मात्र गैरफायदा उठविण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला, तरुण मुली सर्रास सोशल मीडियाचा वापर करीत असतात. पंढरपूर येथील एका महिलेला एक अज्ञात फोन आला आणि 'कर्ज हवे आहे काय'? अशी विचारणा झाली. सदर महिलेला कर्जाची गरज होती त्यामुळे या महिलेने कर्ज घेण्यास होकार दिला. कर्जासाठी म्हणून या महिलेकडून आधार कार्ड, पण कार्ड आणि फोटो मागवून घेण्यात आले. कर्जासाठी म्हणून या महिलेनेही फोटो आणि कागदपत्रे त्या व्यक्तीला पाठवली. 


कर्जाची अपेक्षा असलेल्या या महिलेला चार हजार रुपयांचे कर्ज देखील मिळाले परंतु नंतर कर्ज दिलेल्या कंपनीनेच काही फोटो या महिलेच्या मोबाईलवर पाठवले. हे फोटो पाहून सदर महिलेला मोठा धक्का बसला. सदर महिलेचे अश्लील फोटो तिलाच पाठविण्यात आले होते. कर्जासाठी दिलेल्या फोटोत बदल करून, फोटोतील चेहरा वापरून अश्लील फोटो तयार करण्यात आले होते. हे फोटो पाठविल्यानंतर या महिलेला ब्लॅकमेल करणे सुरु केले. हजारो रुपयांची मागणी करीत पैसे न दिल्यास सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देखील देणे सुरु झाले. 


सदर प्रकाराने महिला गोंधळून आणि घाबरून गेली. तरीही या धाडसी महिलेने ब्लॅकमेलरला पैसे न पाठवता तिने थेट पंढरपूर शहर पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यातील निर्भया पथकाशी संपर्क साधून आपली तक्रार दाखल केली. या प्रकाराबाबत संबंधित व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास देखील सुरु केला आहे. (Blackmailing a woman by making obscene photos) अशा प्रकारे महिलांची बदनामी करण्याची धमकी देणारा आणि महिलांना ब्लॅकमेल करणारा प्रकार पंढरपूर शहरापर्यंत येऊन ठेपला असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. 


या घटनेने महिला वर्गात मात्र भीतीचे आणि चिंतेचे  वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडिया वापरताना महिला, तरुणी आपले फोटो डीपी म्हणून देखील वापरत असतात तसेच विविध कामासाठी देखील फोटो दिले जातात. पण फोटोचा अशा प्रकारे गैरवापर होऊ लागल्यामुळे एक नवीच डोकेदुखी समोर आली आहे. कुठल्याही अपरिचित व्यक्तीला आपले फोटो दिले जाऊ नयेत हेच या घटनेने अधोरेखित केले आहे. सदर महिलेबाबत घडलेली घटना कानावर येताच महिला वर्गात चिंता व्यक्त होताना दिसत आहे.       




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !