BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० ऑक्टो, २०२२

एकाच रात्री कालव्यावरील पाच मोटारींची चोरी !




शोध न्यूज : कालव्यावरून शेतीसाठी पाण्याचा उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांनी बसवलेले पाच विद्युत पंप एकाच रात्रीत चोरून नेल्याची घटना घडली असून यामुळे शेतकरी बांधवांत एकच खळबळ उडाली आहे. 


चोरट्यांनी सगळीकडेच उच्छाद मांडला असून बंद घर दिसले की घरफोडी केली जात आहे, रस्त्यावर फसवून लुटमार केली जात आहे आणि आता शेतीला पाणी  देण्यासाठी कालव्यावर बसविण्यात आलेल्या विद्युत मोटारी देखील चोरून नेल्या आहेत. एकाच रात्रीत एकाच ठिकाणी असलेल्या पाच विद्युत पंप चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकरी वेगवेगळ्या अडचणींचा सामना करीत असताना आता चोर त्यांच्या मोटारी देखील चोरून नेऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीत पिकांना पाणी द्यायचे की रात्रभर मोटारीची राखण करीत कालव्यावर बसून राहायचे असा प्रश्न आता बळीराजापुढे उभा राहिला आहे.

 

याप्रकरणी मोहोळ तालुक्यातील अंकोली (टोंगवस्ती ) येथील दादासाहेब तानाजी जगताप यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस हे विद्यूत पंप चोरून नेल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. १८ ऑक्टोबर रात्रीच्या दहा वाजल्यापासून सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली आहे. चोरीस गेलेल्या पाच मोटारीपैकी दाद्साहेब तानाजी जगताप यांच्या दोन मोटारी असून अनिल शिवाजी जगताप, शैलेश जयसिंगराव सावंतर आणि पांडुरंग हरिदास पवार यांच्याही प्रत्येकी एक मोटारी चोरीस गेल्या आहेत. दादासाहेब जगताप यांनी अंकोली येथील मुख्य कालव्यातून पाईपलाईन करून आपल्या शेतात पिकांसाठी पाणी आणलेले आहे. त्यांनी कालव्यावर ५ अश्वशक्तीच्या लक्ष्मी मोनो ब्लॉक आणि लुबी कंपनीची ५ अश्वशक्तीची मोनो ब्लॉक अशा दोन मोटारी बसवलेल्या होत्या. 


जगताप यांनी आपल्या शेतातील पिकांना दिवसभर याच मोटारीच्या सहाय्याने पाणी दिले परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता या मोटारी जागेवर दिसून आल्या नाही. सकाळी सात वाजता पांडुरंग हरिदास पवार हे आपल्या मोटारीजवळ गेले असता त्यांना त्यांची विद्युत मोटार जागेवर दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी जवळपास मोटारी असलेल्या अन्य शेतकऱ्यांना फोन करून याची माहिती दिली आणि तुमच्या मोटारी जागेवर आहेत काय? याची विचारणा केली. ही माहिती मिळाली तेंव्हा दादासाहेब जगताप मोटारीच्या जागेकडे गेले पण त्यानाही त्यांच्या दोन मोटारी जागेवर नसल्याचे दिसून आले. जवळपास असलेल्या आणखी तीन मोटारी देखील चोरीस गेल्याचे त्यांना समजले. एका रात्रीत अज्ञात चोरट्यांनी पाच विद्युत मोटारी चोरीला गेल्याच्या घटनेने परिसरातील शेतकरी देखील धास्तावले आहेत. 


कालव्यावरील मोटारी चोरी गेल्याप्रकरणी दादासाहेब जगताप यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Five electric pumps on the canal stolen in one night) एका रात्रीत पाच मोटारी चोरीला गेल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत पडले आहेत. 


 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !