BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० ऑक्टो, २०२२

पोलिसांच्या विरोधात शेतकरी उच्च न्यायालयात !

 



शोध न्यूज : मोबाईल चोरी झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत माढा तालुक्यातील एका शेतकऱ्याने थेट उच्च न्यायालयातच याचिका दाखल केली आहे.


मोबाईल चोरीच्या घटना सगळीकडेच मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मोबाईलची चोरी झाली की नागरिक पोलीस ठाण्यात धाव घेतात. काही वेळा पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ किंवा विलंब देखील करतात पण यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान देखील होत असते. माढा तालुक्यातील लऊळ येथील शेतकरी महादेव आजिनाथ भोंग यांचा मोबाईल चोरीला गेला आणि त्याच मोबाईल  मधील अँप वापरून चोरट्यांनी तब्बल ९ लाख ७ हजार ६०२ रुपये काढून घेतले. ही रक्कम चोरी जाण्यास पोलिसांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप भोंग यांनी केला आहे आणि त्यासाठी त्यांनी थेट उच्च न्यायालयातच धाव घेतली आहे. 


शेतकरी महादेव भोंग यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबत माहिती दिली आहे. आपला मोबाईल १४ ऑगष्ट रोजी सकाळी ९ वाजता आठवडा बाजरातून चोरीला गेला. सदर चोरीची तक्रार देण्यासाठी ते कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गेले परंतु मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली असा आरोप भोंग यांनी केला आहे. मोबाईल चोरीला गेला असताना तो गहाळ झाला असल्याची तक्रार घेण्यास प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक बोधे यांनी ठाणे अंमलदार यांना सांगितले. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली तसेच मोबाईल चोराने मोबाईलच्या एपमधून मोठी रक्कम चोरली त्यामुळे भरपाई मिळावी म्हणून भोंग यांनी वरिष्ठांकडे दाद मागितली. त्यानंतरही तक्रारी अर्जावर पोहोच देण्याशिवाय फिर्याद दाखल करण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप भोंग यांनी केला. 


सदर प्रकरणी पोलिसांनी १९ ऑगस्ट रोजी फिर्याद दाखल करून घेतली. दरम्यान त्यांच्या मोबाईलच्या आधाराने ९ लाख ७ हजार ६०२ रुपयांची रक्कम चोरट्यांनी काढून घेतली होती. वेळेत गुन्हा दाखल केला असता आणि सायबर विभागाला कळवले गेले असते तर आपली ही रक्कम वाचू शकली असती. पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे आपले हे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून भोंग यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. पोलिसांनी केलेल्या टाळाटाळीमुळे आपले हे नुकसान झाले असल्याचा त्यांचा आरोप आहे. 


कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातील प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे, पोलीस नाईक बाळासाहेब दाढे यांना जबाबदार धरून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती भोंग यांनी दिली. पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे झालेल्या नुकसान भरपाईची मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली असल्याचे शेतकरी महादेव भोंग यांनी सांगितले आहे. (Financial loss due to police, farmers in high court)  पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नुकसान भरपाई मागण्यासाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेण्याची ही घटना दुर्मिळ मानली जात आहे.     




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !