BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ ऑक्टो, २०२२

साखर कारखान्यावर कामगारांची दगडफेक !




शोध न्यूज : साखर कारखानदारीच्या विरोधात शेतकरी आक्रमक होत असतानाच आता कामगार देखील आक्रमण करू लागले असून साखर कारखान्याच्या कामगारांनीच ऐन दिवाळीत कारखान्यावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. 


उसाला योग्य दर दिला जात नाही तसेच एफआरपी रक्कम देण्याबाबत देखील प्रचंड उदासीनता दाखवली जाते म्हणून राज्यातील अनेक साखर कारखान्याच्या विरोधात उस उत्पादक शेतकरी संतप्त आहेत. साखर कारखाने वजनात काटा मारतात असे देखील आरोप होत असून वजनाची प्रक्रिया ऑनलाईन करण्यासह अनेक  मागण्या ऊस उत्पादक करीत आहेत. ऊस उत्पादक सभासद हा कारखान्याचा मालक असूनही कारखान्याचे संचालक मंडळ त्यांच्या हिताचा निर्णय घेत नसल्याबाबत आधीच संताप असून आता तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाची तोड रोखणे सुरु केले आहे. 


साखर कारखान्यावर शेतकरी संताप व्यक्त करीत असताना कारखान्याचे कामगार देखील सतत नाराज असतात. त्यांच्या वेतनाचा प्रश्न उपस्थित होत असतोच पण आता ऐन दिवाळीत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील दौलत अथर्व सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी कारखान्यावरच दगडफेक केली आहे. कारखाना प्रशासनाने बोनस न दिल्याने दिवाळीच्या सणात ही दगडफेक होण्याची घटना घडली आहे. आज दिवाळीच्या मुहूर्तावर या कारखान्याची सुरुवात होणार होती परंतु कामगारांना बोनस न दिल्याने कामगार आक्रमक झाले आहेत आणि बोनस दिल्याशिवाय कामगार कामावर येणार नाहीत असा पवित्रा कामगारांनी घेतला आहे.

 
बोनसच्या मागणीसाठी कामगारांनी आज कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. कामगारांच्या ३५ दिवसांच्या संपानंतर हा सहकारी साखर कारखाना आज सुरु होईल असे चित्र दिसत होते परंतु प्रत्यक्षात वेगळेच घडले. कामगार आणि कारखाना प्रशासन यांच्यात आणखी एकदा संघर्ष भडकला आणि कामगारांनी दगडफेक केली. या दगडफेकीत कारखाना कार्यालयाच्या काचा फुटल्या आहेत आणि नुकसान झाले आहे. कारखाना प्रशासन मात्र बोनस देण्यास असमर्थता दाखवत आहे त्यामुळे अथर्व कारखाना सुरु होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. 


कामगारांची देणी देण्यासाठी ५ कोटींची लागत आहेत आणि कामगार बोनस म्हणून तीन पगारांची मागणी करीत आहेत. ही मागणी मान्य करणे शक्य नसून जवळपास चाळीस कामगारांनी कारखाना बंद पाडण्याची सुपारी घेतली असल्यासारखे वागत असल्याचा आरोप कारखाना प्रशासनाने केला आहे. (Workers pelted stones at the sugar factory) दहशतीचे वातावरण तयार करून कारखाना बंद पाडू पाहणाऱ्या कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली आहे त्यामुळे हा संघर्ष अधिकच भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !