BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ ऑक्टो, २०२२

'मशाली' पाठोपाठ शिंदे गटाची 'ढाल तलवार' देखील अडचणीत !

 



शोध न्यूज : निवडणूक आयोगाने नुकत्याच दिलेल्या 'मशाल' चिन्हावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर आता शिंदे गटाची 'ढाल तलवार' देखील अडचणीत आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग देखील आता चर्चेचा विषय बनू लागला आहे. 


केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच ठाकरे आणि शिंदे गटाच्या पक्षाच्या नावाबाबत आणि निवडणूक चिन्हाबाबत निर्णय दिला आहे. त्यानुसार 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' आणि 'बाळासाहेबांची शिवसेना'  असे दोन पक्ष झाले असून उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' हे निवडणूक चिन्ह दिले आहे तर शिंदे गटाला 'ढाल तलवार' हे चिन्ह देण्यात आले आहे. अर्थात शिवसेनेने आधीपासूनच आक्षेप घेतलेला असून 'धनुष्यबाण' हे आपलेच चिन्ह असल्याचा दावा ठासून केला आहे. अर्थात निवडणूक आयोगाने केवळ अंधेरी पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय दिला असला तरी देखील ही चिन्हे निश्चित होताना बराच गदारोळ झालेला आहे. केंद्रीय तपास यंत्रणावर आक्षेप घेतला जात होता तसाच आक्षेप शिवसेना उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगावर घेतलेला आहे. उच्च न्यायालयात देखील याबाबत दाद मागण्यात आलेली आहे. 


अंधेरी पोटनिवडणूक प्रक्रिया आता सुरु झाली असून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष 'मशाल' चिन्हावर निवडणूक लढवत आहे, बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाने या निवडणुकीत आपला उमेदवार दिला नाही. भाजपच्या युतीत  ही निवडणूक लढली जात आहे. चिन्हाचे अधिकृत वाटप झाल्यानंतर हा विषय किमान या पोट निवडणुकीपुरता तरी संपला असे वाटत असतानाच समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. 'मशाल' हे चिन्ह समता पार्टीचे असताना ते शिवसेनेला कसे दिले गेले असा सवाल उपस्थित करीत समता पार्टीने निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. यासंदर्भात आवश्यकता भासल्यास न्यायालयात जाण्याचाही इशारा समता पार्टीने दिला आहे. समता पार्टीच्या या दाव्यामुळे मशाल हे निवडणूक चिन्ह पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आणि आता शिंदे गटाला दिलेली 'ढाल तलवार' देखील आक्षेपित झाली आहे. 


धार्मिक विषयाशी निगडीत निवडणूक चिन्ह कुठल्याही पक्षाला दिले जात नाही परंतु शिंदे गटाला देण्यात आलेले ढाल तलवार हे चिन्ह धार्मिक विषयाशी निगडीत असल्याचा आक्षेप शीख समाजाने घेतला आहे. नांदेड यथील शीख समाजाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला असून संचखंड गुरुद्वार बोर्डाचे रणजीतसिंह कामठेकर यांनी निवडणूक आयोगाला विचारणा केली आहे.  शिंदे गटाला देण्यात आलेले 'ढाल तलवार' हे चिन्ह खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी मिळते जुळते असल्याने त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर केला जाऊ नये असे शीख समाजाने निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 


  • "ढाल तलवार ही शिखांची धार्मिक निशाणी आहे. श्री गुरु गोविंदसिंग यांनी जेव्हा खालसा धर्माची स्थापना केली त्यावेळी 'ढाल तलवार' रक्षणासाठी अर्पण केली होती. शिखांच्या पाचही तख्तांवर रोज ढाल तलवारीचे पूजन केले जाते. त्यामुळे हे निवडणूक चिन्ह म्हणून देऊ नये"


'ढाल तलवार' हे चिन्ह आधी पीपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंटकडे होते परंतु सन २००४ मध्ये हा पक्ष यादीतून वगळण्यात आला आहे त्यामुळे त्यांचे हे चिन्ह 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षास दिले आहे. शिंदे गटाने आधी सूर्य हे चिन्ह मागितले होते परंतु ते अन्य पक्षाशी संबंधित असल्यामुळे त्यांना मिळाले नव्हते तसेच उद्धव ठाकरे गटाने मागितलेले त्रिशूळ हे चिन्ह देखील नाकारण्यात आले होते. (
Objection to election symbol of Shinde group) शीख समाजांच्या या आक्षेपामुळे मात्र शिंदे गटाला दिलेले निवडणूक चिन्ह अडचणीत आले असून निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेतो यावर या चिन्हाचे  भवितव्य अवलंबून आहे.  


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !