BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ ऑक्टो, २०२२

पावसाचा धिंगाणा, नदीवरील बंधाऱ्याचा भराव फुटला !

 



शोध न्यूज : पावसाने परतीचा प्रवास सुरु करता करता राज्याच्या काही भागात भलताच धिंगाणा घातला असून सोलापूर जिल्ह्यातील एका बंधाऱ्याचा भराव फुटून पाण्याने आपला रस्ता मोकळा केला आहे. 


यंदा राज्यात सगळीकडे पाऊस धो धो कोसळला आणि नद्या नाले तुडुंब भरून वाहिलेच पण धरणांची पातळी देखील वाढवली. सगळी धरणे यावर्षी तुडुंब झाली आणि पावसाळा संपला असे वाटत असतानाच पावसाने पुन्हा दणका दिला आणि जनजीवन विस्कळीत करून टाकले. पावसाळ्याच्या दिवसात सोलापूर जिल्ह्यात तुलनेने कमी पाऊस झाला असला तरी सतत पुराच्या परिस्थितीचा सामना मात्र या जिल्ह्याला करावा लागला आहे आणि त्याचे नुकसानही सहन करावे लागले आहे. आता पाऊस संपला असे वाटत असतानाच माढा तालुक्याला पावसाने मोठा फटका दिला आणि शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान करून हा शेवटचा पाऊस परतीच्या प्रवासाला लागला. एवढ्या नुकसानीनंतर आता तरी उसंत मिळेल असे वाटत असतानाच पुणे परिसरात पावसाने पुन्हा आपला प्रताप दाखवला आणि त्याचा फटका सोलापूर जिल्ह्याला सहन करावा लागू लागला आहे. 


पुणे परिसरात झालेल्या पावसाने उजनी धरणात मोठ्या प्रमाणात विसर्ग येत राहिलाच पण नीरा नदीनेही आपली पातळी सोडली. त्याचा परिणाम सोलापूर जिल्हात दिसू लागला आहे. उजनी धरणातून विसर्ग सोडवा लागला आणि भीमा नदीची पातळी पुन्हा एकदा वाढली आहे. ही पातळी एवढी वाढली की पंढरपूर शहरातील नदी काठावरील असलेल्या लोकवसाहतीत दाणादाण उडाली. व्यास नारायण झोपडपट्टी परिसरात पुराचे पाणी घुसले त्यामुळे ऐन सणाच्या कालावधीत गरीब लोकांना आपले घरदार सोडून जाण्याची वेळ आली. याच परिस्थितीत नीरा नदीने कालपासूनच आपला किनारा सोडला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलेला असतानाच आज नदीवरील बंधारा धोक्यात आला आहे. पुराच्या प्रवाहाचा वेग अधिक असल्याने नदीवरील बंधाऱ्याचा भराव फुटून पाणी आपल्या वाटेने जाऊ लागले आहे. 


सगळीकडेच पुराची परिस्थिती निर्माण झालेली असताना माळशिरस तालुक्यातही पूरस्थीती निर्माण झाली आहे.अकलाई लुमेवाडी, तांबवे-ओझरे बंधाऱ्यावर पुराचेपाणी आले. पुराच्या या पाण्यामुळे लुमेवाडी-माळीनगर आणि  गिरवी-गणेशगाव या गावांना जोडणाऱ्या कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा भराव तुटला आहे. त्यामुळे पाणी मुक्तपणे आपल्या मार्गाने धावत सुटले आहे. विशेष म्हणजे याच बंधाऱ्याची डागडुजी दोन वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. सोलापूर - पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या बंधाऱ्याना पुराच्या संकटांचा सामना करावा लागू लागल्यामुळे दळणवळणाचाही मोठा प्रश्न उभा राहिला आहे. परीक्षेचा कालावधी असल्याने शालेय विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसताना दिसत आहे. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !