BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ डिसें, २०२३

अबब ! हरभऱ्याच्या भाजीनेही खाल्ला भलताच भाव ! चिकन पेक्षाही झाली महाग !!


शोध न्यूज : पंढरीच्या बाजारात हरभरा भाजीने भलताच भाव खाल्ला असून, चिकनपेक्षाही या भाजीला दर येऊ लागला आहे. तरीही ग्राहकही आवडीने हरभरा भाजी घेताना दिसत आहेत.


बाजारात कधी कोणती वस्तू भाव खाऊन जाईल हे काही सांगता येत नाही. कांदा, टोमॅटो यांच्या दराबाबत तर नेहमीच चढ उतार असतात. कधी मातीमोल दराने तर कधी ग्राहकांना राबविणारे दर मिळत असतात. बळीराजा शेतात राब राब राबतो आणि कांदा घेऊन बाजारात गेला की दर पाहून रड रड रडतो, असा अनुभव नेहमीच येत असतो. शेतीमालाला योग्य दर मिळावा एवढीच त्याची अपेक्षा असते पण बाजारात असे होताना दिसत नाही. पाण्याची बाटली मोठ्या किमतीला खरेदी करणारा ग्राहक, बाजारात गेला की भाजी घेताना घासाघीस घालत असतो. अशा परिस्थितीत पंढरीच्या बाजारात हरभरा भाजी मात्र भलताच भाव खाऊन गेली आहे.  ब्रॉयलर चिकनच्या दारापेक्षाही जादा दर या हरभरा भाजीला आला आहे.  दुर्मिळ झालेली हरभरा भाजी पंढरीच्या बाजारात मोठ्या दराने विकली गेली आहे. 


हरभरा भाजी ही तशी दुर्मिळ भाजी आहे, ही भाजी मिळविण्यासाठी शेतकऱ्याला मोठे परिश्रम घ्यावे लागतात. कारण ही भाजी खुडून मिळवावी लागते. अन्य पालेभाज्यासारखी ही भाजी अखंड मिळत नसते. हरभरा पेरणीनंतर योग्य वेळीच ही भाजी मिळू शकते. हरभरा रोपट्याला आंब असते त्यामुळे ही भाजी खुडताना हाताच्या बोटाना जखमा होत असतात. प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांसारखे अनेक पोषक घटक या भाजीत असतात, शिवाय बद्धकोष्ठता, मधुमेह असा विकारात देखील या भाजीचा लाभ होत असतो. परंतु ही भाजी बाजारात क्वचितच मिळते. शिवाय चव असलेली भाजी अलीकडे सहजासहजी मिळत नाही.  अनेकांना तर या भाजीची चव देखील माहिती नाही.  हिवाळ्याच्या दिवसात मिळणारी ही भाजी उपलब्ध होऊ शकते पण बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा खूप कमी प्रमाणात होत असतो, त्याचाच परिणाम या भाजीच्या दरावर होत असतो. 


पंढरीच्या बाजरात ही भाजी क्वचित प्रसंगी दिसू लागली असून, ब्रॉयलर चिकनला मागे सारून या भाजीने भाव खाल्ला आहे. ब्रॉयलर चिकन दोनशे ते दोनशे वीस रुपये दराने मिळते मात्र ही भाजी २४० रुपये किलो दराने विकली जाऊ लागली आहे.  पंढरीच्या बाजारात हरभरा भाजीचा दर पन्नास ते साठ रुपये पाव किलो असा आहे. ही भाजी सहजासहजी उपलब्ध होत नसल्यामुळे चिकनपेक्षा अधिक दर असला तरी, ग्राहक ही भाजी खरेदी करताना दिसत आहेत. हरभरा भाजीलाही चांगले दिवस आल्याचे यामुळे दिसू लागले आहे. (Gram vegetable is more expensive than chicken)  हे दर वाढल्यामुळे या भाजीत फसवणूक होण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे. कारण योग्य वेळी खुडलेली भाजीच चविष्ठ असते, अन्यवेळी ही भाजावी खुडलेली असेल तर तिला मात्र चव मिळत नाही. काही असो, कधी नव्हे ते, हरभरा भाजीचेही 'अच्छे दिन' आले एवढे मात्र खरे !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !