शोध न्यूज : चहाचा घोट घेईपर्यंत चौदा लाखांच्या बॅगेची हातोहात चोरी झाली असून या चोरी प्रकरणी माजी उपसरपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण, कधी आणि कुठे चोरी करील हे काही सांगता येत नाही, ज्याच्यावर विश्वास असतो तेच अधिक धोका देताना दिसतात पण चोरी करण्यासाठी सराईत चोरच असावा असेही काही राहिले नाही. समाजात उजळ माथ्याने आणि प्रतिष्ठित म्हणून मिरवणारे देखील अनेकदा चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात जाताना दिसतात. करमाळा येथील एका घटनेची अशीच चर्चा सुरु झाली असून तब्बल १४ लाख रुपयांच्या पैशाची बॅग लंपास केल्याच्या घटनेत एका माजी उप सरपंचाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यात चर्चा आणि आश्चर्य देखील व्यक्त होताना दिसत आहे.
पूनम जनरल स्टोअरचे मालक सुशील कांतीलाल कात्रेला यांनी करमाळा तालुक्यातील करंजे गावाचे माजी उपसरपंच शरद पवार यांच्याविरोधात पोलिसात फिर्याद दिली आहे आणि त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्यापारी कात्रेला हे त्यांच्या कारमधून मित्र सचिन पांढरे समवेत बँकेत निघाले होते. बँकेत भरणा करण्यासाठी १४ लाख रुपयांची रोकड असलेली एक बॅग त्यांनी गाडीत ठेवली होती. बँकेत जाता जाता ते करमाळा बस स्थानकावर चहा घेण्यासाठी थांबले होते. यावेळी त्यांच्या गाडीतील १४ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास करण्यात आली. चहा घेईपर्यंत गाडीतील ही पैशाची बॅग बेपत्ता झालेली होती.
व्यापारी कात्रेला आणि त्यांचे मित्र सचिन पांढरे हे चहा पिण्यासाठी खाली उतरले नव्हते तर ते गाडीत बसूनच चहा घेत होते. याच वेळी ओळखीचा असलेला शरद पवार येथे आला आणि तो बोलत गाडीच्या मागच्या सीटवर बसला. तेथुन त्याने पुढील सीटवर मध्यभागी ठेवलेली पैशाची बॅग चोरून तो पळून गेला. (Merchant's money bag stolen, theft of fourteen lakhs) त्याचा पाठलाग केला असता तो सापडला नाही, त्याची शोधाशोध केली पण तो मिळून आला नाही असे कात्रेला यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
चोरीस गेलेल्या बॅगेत १४ लाख रुपये रोख, ६ हजार ३७५ रुपयांचा एक धनादेश, आधारकार्ड, काही कागदपत्र होती. रोख रकमेसह त्यांची कागदपत्रेही चोरीस गेली. बस स्थानकावर चहा घेण्यासाठी कात्रेला थांबले असताना तेथे त्यांच्या ओळखीचे असणारे करंजे येथील माजी उप सरपंच शरद पवार हे तेथे आले होते. पवार यानेच आपली पैशाची बॅग लंपास केली असल्याची तक्रार व्यापारी कात्रेला यांनी पोलिसांकडे केली असून पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला आहे. एवढ्या मोठ्या रकमेची चोरी काही क्षणात होणे आणि माजी उपसरपंच असलेल्या व्यक्तीवर याबाबत गुन्हा दाखल होणे या बाबी तालुक्यात चर्चेच्या ठरल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !