BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ ऑक्टो, २०२२

आमदार बच्चू कडू संतापले, शिंदे - फडणवीस सरकार अडचणीत येणार?

 


शोध न्यूज : मंत्रीपद न मिळाल्याने  आमदार बच्चू कडू आधीच नाराज असताना आता ते प्रचंड संतापले असून पाच दिवसानंतर बारा आमदारांना घेवून वेगळा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू हे शेतकरी आणि सामन्यांच्यासाठी सामान्य होऊन काम करतात. प्रसंगी ते प्रचंड आक्रमक होतात. त्यांना मानणारा वर्ग राज्याच्या विविध भागात असून स्पष्टवक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कडू हे मंत्री होते तरीदेखील बंडखोरी करून ते शिंदे गटात दाखल झाले आहेत. पण आता त्यांच्या आक्रमक विधानामुळे राज्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे. शिंदे सरकार असंवैधानिक असल्याचा आणि ते लवकरच कोसळण्याचे आरोप होत असतानाच बच्चू कडू यांनी इशारा दिला आहे. शिंदे गटात अतर्गत नाराजी वाढली असून हे सरकार फार काळ टिकणार नाही असा कयास विरोधक लावत आहेत त्यात आमदार कडू यांचा हा इशारा अत्यंत महत्वाचा आणि सरकारवर परिणाम करणारा ठरणार असल्याचे दिसत आहे. 


शिवसेनेतून फुटून शिंदे गट बाजूला गेला. त्यांच्यासोबत आमदार बच्चू कडू हे देखील गेले. आपले मंत्रीपद सोडून आमदार कडू गेले परंतु पहिल्या विस्तारात त्यांना मंत्रीपदापासून डावलले. त्यानंतर त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केलेली आहे.  पुढील विस्तारत संधी मिळेल इथपासून आता अडीच वर्षानंतर मंत्रीपद मिळेल अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी माध्यमांच्या समोर व्यक्त केली आहे. मंत्रीपद मिळाले नाही तरीही बच्चू कडू यांनी एकदम टोकाची भाषा केली नाही पण आता मात्र त्यांनी आपण वेगळा विचार करू असे सांगत १ नोव्हेंबरचे तारीख देखील दिली आहे. (MLA Bachu is bitterly angry, Shinde-Fadnavis government will be in trouble) खरोखरच बच्चू कडू यांनी काही निर्णय घेतला तर मात्र तीन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेत आलेले शिंदे - फडणवीस यांचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात गेल्या काही दिवसापासून टोकाचे वाद सुरु आहेत. अत्यंत टोकाची भाषा वापरली जात असतानाच आ. राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर आरोप करताना पन्नास खोक्यांचा विषय उचलून धरला आहे. आमदार कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यावधी रुपये लाटले आहेत असा आरोप राणा यांनी केला होता. या आरोपावर आ. कडू प्रचंड संतापलेले आहेत. शिंदे गटाच्या सोबत जाताना आपण वेगळा विचार घेवून गेलो होतो पण आता सत्तेत असलेला आणि मंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या आ. रवी राणा यांनी आपल्यासह पन्नास आमदारांवर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यावरही हे आरोप आहेत. मला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न असून १ नोव्हेंबर पर्यंत पुरावे देण्याचे आव्हान त्यांनी दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यानाही नोटीस पाठविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


 
वेगळा निर्णय घेणार !
आपल्या अस्तित्वालाच अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न होत असून त्यांचे बोट छाटल्याशिवाय आपण गप्प बसणार नाहीत. आपल्याला काही आमदारांचे देखील फोन आले आहेत आणि त्यांच्याही अस्तित्वाला धक्का लावला जात आहे. पन्नास खोके घेतल्याचे आरोप विरोधक करीत होते इथवर हे ठीक होते पण आमच्यातीलच माणसं हे बोलू लागले आहेत त्यामुळे आम्ही खोके घेवून शिंदे यांच्यासोबत गेलो असा संदेश बाहेर जात आहे. येत्या १ नोव्हेबर रोजी आम्ही आणि सोबत असलेले बारा आमदार निर्णय घेणार आहोत असे आमदार कडू यांनी स्पष्टच सांगितले आहे.


असे होणार नाही - दरेकर 
बच्चू कडू यांनी रोखठोकपणे आपली भूमिका जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरणात दुसरा भूकंप येऊ घातल्याचे दिसत असतांनाच बच्चू कडू असा चुकीचा निर्णय घेणार नाहीत असा विश्वास भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी आमदार कडू यांचे संबंध चांगले असून हा विषय टोकाला जाईल असे वाटत नाही. आ. राणा आणि कडू यांच्यातील वादाची दखल वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली आहे त्यामुळे हा विषय मिटेल असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला आहे. 


सहन करणार नाही - कडू 

भारतीय जनता पक्षाच्या आडोशाला दडून स्टंटबाजी  करीत असलेल्या रवी राणा यांच्याकडून करण्यात आलेल्या खोक्यांच्या आरोपामुळे आपल्यासह पन्नास आमदार नाराज आहेत. सत्तेला लाथ मारणारा आपण स्वाभिमानी माणूस असून असले आरोप सहन करणार नाही. राणा यांनी हे आरोप सिद्ध करावेत, नाही केले तर माफी मागावी, त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. याप्रकरणी आता पुढे काय घडतेय हे पाहावे लागणार आहे. कडू यांनी १ नोव्हेंबरचा अल्टीमेटम दिला आहे त्यामुळे वेळ खूप कमी आहे. बच्चू कडू माघार घेणार की रवी राणा माफी मागणार ? याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !