BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ ऑक्टो, २०२२

ग्राहक म्हणून आला, दुकानदाराला लुटून गेला !


शोध न्यूज : गिऱ्हाईक म्हणून दुकानात आला आणि भरदिवसा ७० हजाराला चुना लावून गेला अशी घटना गजबजलेल्या परिसरात असलेल्या एक किराणा दुकानात घडली आहे.


दिवाळीचे दिवस असल्यामुळे सद्या विविध दुकानात ग्राहकांची गर्दी आहे. याच गर्दीचा फायदा घेत काही भामटे देखील घुसत असतात त्यामुळे दुकान मालकास अत्यंत दक्ष राहावे लागते आणि प्रत्येकाकडे बारीक लक्ष देत आपला व्यवसाय करावा लागतो. त्यातूनही अट्टल भामटे कधी आपला हाताची करामत दाखवून पसार होतात हे कळत देखील नाही. दुकानात ग्राहक बनून आलेली व्यक्ती चोरी करून गेल्यानंतर उशिराने ही बाब लक्षात येते. दुकानात सीसीटीव्ही असतील तर तपास सोपा होतो परंतु असा काही पुरावा न मिळाल्यास तपासात देखील अडचण निर्माण होत असते. मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील किराणा दुकानात असाच एक भामटा ग्राहक बनून आला आणि नकळत ७० हजार रुपयांना चुना देखील लावून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.


दुकानदार रामा रखमाजी गरडे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून त्यानुसार पोलीसनि अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामा गरडे हे गोणेवाडी गावात बस स्थानकाच्या परिसरात श्रीराम किराणा दुकान चालवतात. त्यावरच त्यांची आणि कुटुंबाची उपजीविका आहे. दररोज सकाळी ७ वाजता उघडलेले हे दुकान रात्री ९ वाजेपर्यंत सुरु असते. दिवाळीचा सण असल्यामुळे गरडे यांनी आपल्या दुकानात विविध प्रकारचा माल भरलेला आहे. फोन पे आणि गुगल पे ही सुविधा देखील ते देत असतात. मालाची विक्री करून आलेली रक्कम ते दुकानातील एका काउंटरमध्ये ठेवत असतात. त्यांचे दुकान सुरु असताना चाळीस ते पंचेचाळीस वर्षे वयाचा एक व्यक्ती दुकानात आला. काडीपेटी आणि नारळ अशी मागणी त्याने केली. सामान्य ग्राहकांप्रमाणेच ही व्यक्ती आली होती त्यामुळे संशय घेण्यासारखे काहीच नव्हते.


रामा गरडे यांच्या दुकानात नारळ नसल्यमुएल ते नारळ आणण्यासाठी म्हणून शेजारच्या गाळ्याकडे गेले. जाताना त्यांनी आपला मोबाईल दुकानाती काउंटरच्या खाली ठेवला. गरडे जेंव्हा परत आले तेंव्हा सदर ग्राहक दुकानात दिसून आला नाही. त्यानंतर काही वेळाने गावातील महादेव गवळी दुकानात आला आणि त्याने एक हजार रुपयांची मागणी केली. यावेळी मोबाईल घेण्यासाठी काउंटरखाली पहिले असता त्यांचा मोबाईल जागेवर दिसून आला नाही. या मोबाईलचा शोध घेतला जात असतानाच दिवसभरातील माल विक्रीची रक्कम गायब असल्याचे दिसून आले. नारळ मागण्याचे निमित्त करून आलेल्या व्यक्तीनेच ही चोरी केली असल्याचा संशय बळावला आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठून आपली तक्रार दिली आहे.

 

दिवसभरातील दुकान मालाची विक्री झालेले ६० हजार रुपये आणि दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल घेवून चोरटा पसार झाला होता. पाचशे रुपयांच्या १२० नोटा गरडे यांनी ठेवलेल्या होत्या त्या सगळ्याच अज्ञात चोरट्याने पळविल्या आहेत. (Came as a customer, robbed the shopkeeper)याबाबत मंगळवेढा पोलिसात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

         



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !