BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ ऑक्टो, २०२२

मस्तीने वागाल तर----------- ! ऊस दर संघर्ष समितीचा इशारा !

 



शोध न्यूज : उस दर संघर्ष समिती दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चालली असून समितीच्या नव्या पवित्र्यामुळे ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची काही खैर नाही असेच संकेत आता मिळू लागले आहेत.


सोलापूर जिल्ह्यात ऊस दर संघर्ष समिती वेगाने पावले टाकू लागली आहे. पंढरीत जोरदार ऊस परिषद घेतली आणि नव्या संघर्षाचा एल्गार पुकारण्यात आला. या हंगामात पहिली उचल अडीच हजार देण्यात यावी आणि अंतिम दर हा ३ हजार १०० रुपयांचा देण्यात यावा अशी मागणीच संघर्ष समितीने केलेली आहे. दोन दिवसात मागणीप्रमाणे कारखान्यांनी जाहीर न केल्यास आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरु होण्याचा इशारा परिषदेत देण्यात आला होता. साखर कारखान्यांनी या मागणीची अथवा इशाऱ्याची कसलीच दखल घेतली नाही. त्यामुळे समितीने आपल्या नियोजनाप्रमाणे पुढील पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काल पंढरपूर तालुक्यातील ऊस तोड थांबवली आणि ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरना अडवून गांधीगिरी दाखवत त्यांना हात जोडून, पाय धरून विनंती करण्यात आली. ऊसाची वाहतूक न करण्याची विनंती केली गेली. 


गांधीगिरीचा मार्ग अवलंब केल्यानंतरही उसाची वाहतूक थांबली नाही तर पुढचा उपाय करण्याचे संकेत समितीकडून मिळत होते आणि त्यानुसार आता संघर्ष समितीने वेगळीच शक्कल लढवली आहे. उसाची वाहतूक करणारे बहुसंख्य ट्रॅक्टर हे वाहतुकीचे कुठलेही नियम पाळत नाहीत शिवाय त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसतात. असे असतानाही क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करतात, हाच मुद्दा पकडून संघर्ष समितीने ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक मालकांना इशाराच दिला आहे. नियमानुसार एक ट्रॅक्टर व दोन ट्रॉल्यामध्ये फक्त दहा टन ऊस वाहतूक करता येते परंतु जवळपास सर्वच ट्रॅक्टर मालक २५ ते ३० टनाने उसाची वाहतूक करत असतात. आरटीओच्या कायद्याने विचार केला तर दहा ते पंधरा टनाने ओव्हरलोड वाहतूक सर्व ट्रॅक्टर मालक करत असतात.


 संघर्ष समितीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची भेट घेऊन उसाची वाहतूक करणारे  ट्रॅक्टर नियमभंग करीत असल्याचे निदर्शनास आणले आहे. नियमानुसार ओव्हरलोड वाहतुकीचा दंड हा पाचपट असतो त्यामुळे दहा टना पेक्षा वरच्या प्रत्येक टणाला ५० हजार ते एक लाख रुपये दंड आरटीओ कडून केला जाऊ शकतो. त्यामुळे ट्रॅक्टर वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांनी आरटीओ चा धसका घेतला आहे.. ट्रॅक्टर मालकांना वारंवार सांगूनही हार घालून हात जोडून पाया पडूनही ऐकायला तयार नाहीत त्यामुळे ऊस दर संघर्ष समितीला नाईलाजाने आरटीओ कडे जाण्याची वेळ आली आहे.  आज पासून सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र आरटीओ ची पथके नेमली  कारवाईला सुरुवात होणार असल्याचीही माहिती मिळत आहे. तसे न झाल्यास ऊस दर संघर्ष समितीने आरटीओ विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे ऐन दिवाळीतच ट्रॅक्टर मालकांचे दिवाळे निघण्याची शक्यता आहे.


सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये वेगवेगळी अकरा पथक नेमून कारखान्याच्या गेटच्या आत जाऊन सुद्धा ओव्हरलोड ट्रॅक्टरचे वजन काट्यावर वजन करून कारवाई होण्याची शक्यता आहे.  ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स, टॅक्स, पासिंग इत्यादी सर्व आवश्यक बाबी ट्रॅक्टर मालकांनी पूर्ण केलेल्या नसतील तर मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ऊस दर संघर्ष समितीच्या या अजब फंडा बघून  ट्रॅक्टर चालक मालकांचे धाबे दणाणले आहेत. (The conflict between farmers and sugar factories increased) ऊस दर संघर्ष समितीने कायद्याच्या चाकोरीतूनच ट्रॅक्टर मालक व कारखानदारांना गुडघे काय लावण्याची ही योग्य वेळ साधली आहे. ऊसाची वाहतूक बंद पडल्यास कारखान्यांचे नाक दाबले जाणार असल्याने या आंदोलनाने आपल्या पदरी काही पडेल अशी आशा आता शेतकरी बांधवाना वाटू लागली आहे. 


उस दर संघर्ष समितीने कारखान्यांना देखील आक्रमक इशारा दिला आहे. त्यामुळे समिती आणि कारखानदारी यांच्यातील संघर्ष अधिकच भडकताना  दिसत असून हा भडका वाढत जाणार याचे संकेत आता मिळू लागले आहेत. साखर कारखानदार  ट्रॅक्टर चालक, मालकास फूस लावतील पण त्यांना मोठ्या कारवाईला आणि दंडाला सामोरे जावे लागेल, हे जर मस्तीने वागत असतील आणि शेतकरी संघटनेचे ऐकत नसतील तर एकही  ट्रॅक्टर अजापासून रस्त्यावर दिसणार नाहीत. याची जबाबदारी शेतकरी संघटनेने घेतली आहे, म्हणून आरटीओ अधिकारी यांची भेट घेतली आहे.  ट्रॅक्टर रस्त्यावर आले तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे असा इशारा देण्यात आला आहे. कारखानदारांना देखील मोठा इशारा दिला गेला असून मुजोरी आम्ही सहन करणार नाही, शेतकऱ्यांच्या ऊसावर दरोडे टाकण्याचे काम थांबवा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशाराच देण्यात आला आहे.   


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !



                 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !