BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ ऑक्टो, २०२२

भीमा नदीच्या पात्रात मगरीचे दर्शन !

 

प्रातिनिधिक चित्र 


शोध न्यूज : भीमा नदीच्या पात्रात मगरीचे दर्शन झाले असून नदी काठावर भीती व्यक्त होऊ लागली आहे. भीमा  नदीत मच्छिमारी करणाऱ्या काही जणांना ही मगर दिसली असल्याचे सांगितले गेले आहे.


उजनी जलाशयात हळूहळू नवनवीन प्राण्याचे आस्तित्व जाणवू लागले असताना अनेक प्रकारचे मासे देखील यापूर्वी आढळून आले आहेत. उजनीचा मोठा जलसंचय अनेक वर्षांपासून असल्याने साहजिकच या पाण्यात विविध जलचर आढळण्याची शक्यता नेहमीच व्यक्त केली जाते परंतु आता थेट मगरीचे दर्शन झाल्याचे समोर आले आहे. भीमा नदी एरवी तशी कोरडीच असते परंतु उजनी धरणातून पाणी सोडल्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहात असते. उजनी धरणात अनेक धरणांचे पाणी मिसळत असते. यावर्षी उजनी धरण जलदगतीने आणि पूर्ण क्षमतेने भरले त्यामुळे भीमा नदीत सतत पाणी सोडावे लागले आहे. भीमा नदीच्या पात्रात अधिकाधिक काळ पाणी राहिले आहे. अशा स्थितीत भीमा नदीत भंडारकवठे परिसरात एक मगर दिसली असल्याचे मच्छिमार सांगू लागले आहेत. 


भीमा नदीत सद्याही भरपूर पाणी असून या पाण्यात मच्छिमार मासेमारी करीत असताना त्यांना या पाण्यात मगर दिसून आली. मगरीचे दर्शन होताच मच्छिमार घाबरून नदीच्या पात्राच्या बाहेर आले.नदीच्या काठावर काही ग्रामस्थ होते, त्यांना ही मगर दाखविण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु तोपर्यंत मगर पुन्हा नदीच्या पाण्यात गेली होती. मच्छीमारांनी ही घटना भंडारकवठे गावातील गावकरी मंडळीना सांगितली, सदर मगर आकाराने देखील मोठी असल्याची माहिती मच्छीमारांनी दिली आहे. त्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीच्या काठावरील परिसरात या मगरीचा शोध घेण्यात आला पण पुन्हा मात्र ही मगर गावकऱ्याना दिसली नाही. 


भीमा नदीच्या काठावर असलेले शेतकरी विविध कारणाने नदीत उतरत असतात. आजवर असा काहीच प्रकार नसल्याचे नदीच्या पात्रात उतरण्याची कसलीही भीती वाटत नव्हती परंतु मगरीच्या अस्तित्वाने आता ही भीती निर्माण झाली आहे. चंद्रभागेच्या पात्रात तर राज्यातून आलेले भाविक मोठ्या श्रद्धेने चंद्रभागा स्नान करतात शिवाय विविध ठिकाणी लोक भीमा नदीत स्नानासाठी जात असतात. पाणी पिण्यासाठी जनावरे देखील नदीच्या काठावर जातात.  नदीकाठच्या महिला कपडे धुण्यासाठीही नदीच्या काठावर जातात त्यामुळे मगरीची भीती अधिक वाढली आहे. मच्छिमारांनी स्वत: ही मगर पहिली असल्याचे सांगितले आहे त्यामुळे मगरीच्या आस्तीत्वाबाबत विश्वास निर्माण झाला आहे. 


भंडारकवठे येथील सरपंच चिदानंद कोटगोंडे यांनी याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. महिलांनी नदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी जाऊ नये तसेच जनावरे देखील नदीच्या पात्रात सोडू  नयेत, नदीकाठच्या शेतकऱ्यानी दक्षता बाळगून शेतीची कामे करावीत तसेच रात्रीच्या वेळी नदीच्या परिसरात जाण्याचे टाळावे असे आवाहन सरपंच कोटगोंडे यांनी केले आहे. (Fear after sighting of crocodile in Bhima river bed) एकूणच या परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून नदीत पाणी असल्याने ही मगर इतरत्र देखील प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमा नदीच्या पात्रात या मगरीची दहशत निर्माण होऊ लागली आहे.    


   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !