BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ ऑक्टो, २०२२

नऊ वर्षांपासून कुटुंबासह फरार, अखेर मुसक्या आवळल्या !

 



शोध न्यूज : सोलापूर पोलिसांना तब्बल ९ वर्षे हुलकावणी देत फरार असलेल्या सोलापूरच्या एका कुटुंबाच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे.


सरकारी कर्मचारी असलेला नंदकुमार उत्तरेश्वर बोराडे या गेल्या ९ वर्षांपासून फरार होता. आपल्या कुटुंबासह तो बेपत्ता झाला होता आणि पोलीस त्याचा शोध घेत होते. तब्बल ९ वर्षे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरलेल्या बोराडे याला कुटुंबासह गजाआड करण्यात यश आले आहे.  नंदकुमार बोराडे हा दुय्यम निबंधक कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होता. त्याने आपल्या पदाचा गैरवापर करीत बँक अधिकारी अरुण गोडसे यांची फसवणूक केली होती. होटगी रोडवरील आरक्षित जागा बळकावून त्याने ही फसवणूक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच बोराडे हा आपल्या कुटुंबासह बेपत्ता झाला होता. तब्बल ९ वर्षे तो फरार राहिला पण अखेर सोलापूर शहर गुन्हे शाखेने त्याला कुटुंबासह अटक करण्यात यश मिळवले आहे. 


शासकीय कर्मचारी असलेल्या बोराडे याने पत्नी सुहासिनी बोराडे आणि भाऊ जगदीश बोराडे यांच्या नावाने एक भागीदारी संस्था स्थापन केली, प्रतिनियुक्तीने दुय्यम निबंधक कार्यालयात सहनिबंधाकाचा पदभार घेतल्यावर त्याने अरुण गोडसे यांचा विश्वास संपादन केला. होटगी रस्त्यावर असलेल्या आरक्षित जागेचा एक बनावट नकाशा देखील त्याने तयार केला आणि सदर जागा आरक्षित नसल्याचे भासवले. त्यानंतर सदर जागा विकसनाचे करारपत्रही तयार करून जेष्ठ नागरिकाची पद्धतशीर फसवणूक केली. ही फसवणूक थोडी थोडकी नव्हे तर तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांचा गंडा त्याने अरुण गोडसे  यांना घातला होता. सदर जागा चार महिन्यात विकासानासाठी ताब्यात देण्याचे करारात ठरले होते परंतु बोराडे याने टाळाटाळ सुरु केली. 


जवळपास दीड कोटीचे हे प्रकरण असल्याने आणि आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर गोडसे यांनी  थेट पोलीस ठाणे गाठले. सन २०१३ मध्ये या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण पोलिसापर्यंत गेल्याने आणि गुन्हा दाखल झाल्याने बोराडे याने आपल्या कुटुंबासह पलायन केले. पोलिसांना हे कुटुंब हवे होते परंतु पोलिसांना चकवा देत हे कुटुंब फरार झाले होते. तब्बल ९ वर्षे ते पुणे, सांगली, कोल्हापूर येथे राहिले आणि पोलिसांना पद्धतशीर हुलकावणी देत राहिले.  या कुटुंबाने अटकपूर्व जामीन मिळविण्याचाही प्रयत्न केलेला होता. जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आणि त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही जामीन फेटाळला तेंव्हा सर्वोच्च  न्यायालयात गेले पण तेथेही त्यांना अटकपूर्व जामीन मिळू शकला नाही. गुन्हा दाखल झाल्यापासून हे कुटुंब फरार राहिले होते. 

 
पोलिसांनी शिताफीने तपास करीत नंदकुमार बोराडे याच्यासह त्याची पत्नी सुहासिनी बोराडे आणि भाऊ जगदीश बोराडे यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना गजाआड करण्यात आले आहे. (
Family absconding for nine years arrested by Solapur police)तब्बल ९ वर्षांपासून पोलिसांना चकवा देण्यात ते यशस्वी झाले होते पण अखेर "कानून के लंबे हात" त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि तिघेही गजाआड जावून बसले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !