BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ ऑक्टो, २०२२

दोन चिमुकल्या मुलांसह गर्भवती मातेची विहिरीत आत्महत्या !



शोध न्यूज : गर्भवती मातेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी मारून तिघांच्या जिवनाचा शेवट केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात नुकतीच अशी एक दुर्दैवी घटना घडली होती. चिमुकल्या लेकरांसह मातेने विहिरीत उडी मारून शेवट करून घेतला होता. या घटनेने सोलापूर जिल्हा कळवळला होता. त्या आधीच सांगली जिल्यात देखील अलीकडेच अशा  प्रकारची एक दुर्दैवी घटना घडली होती  आणि आता पुन्हा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सिंदूर गावात असून संपूर्ण जत तालुका या घटनेने हादरून गेला आहे. २३ वर्षे वयाच्या लक्ष्मीबाई धनेश माडग्याळ ही महिला गर्भवती असताना तिने आपल्या २ वर्षे वयाच्या दिव्या आणि अवघ्या एक वर्षाच्या श्रीशैल या बाळाला घेऊन पहाटेच्या दरम्यान विहिरीत उडी घेतली आणि या विहिरीने तिघांचाही बळी घेतला. तरुण गर्भवती मातेने पोटातल्या बाळासह दोन लहानग्या लेकरांना घेवून हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने परिसरात प्रचंड दु:ख व्यक्त केले जात आहे. 


 मयत लक्ष्मीचे माहेर हे सिंदूर हेच होते. अवघ्या तीन वर्षांपूर्वीच तिचा विवाह गावातील एका तरुणाशी झाला होता परंतु तिला हा तरुण पसंत नव्हता. त्यामुळे तिने गावातल्याच धनेश माडग्याळ याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहित असताना पळून जाऊन तिने दुसऱ्याशी लग्न केल्याचे तिच्या माहेरच्या मंडळीना देखील पसंत नव्हते. या घटनेने ते नाराज होते आणि यामुळेच लक्ष्मीचा तिच्या माहरी कुणाचाच संपर्क उरला नव्हता. सिंदूर गावात लक्ष्मी आणि धनेश हे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर कर्नाटक हद्दीजवळ राहत होते. दिव्या ही मुलगी आणि श्रीशैल हा मुलगा अशी अपत्ये त्यांना झाली होती आणि त्यानंतर लक्ष्मी ही तीन महिन्यांची गर्भवती होती. लक्ष्मीचा पती धनेश हा औषध फवारणीसाठी शेतात गेला असता लक्ष्मीने दिव्या आणि श्रीशैल या दोन मुलांना सोबत घेतले आणि शेतातल्याच विहिरीकडे गेली. आपल्या दोन्ही मुलांना घेवून लक्ष्मीने विहिरीत उडील घेतली आणि सगळ्यांच्याच आयुष्याचा शेवट एकाच वेळी झाला.  


लक्ष्मी आणि मुले घरी नसल्याचे लक्षात आले तेंव्हा त्यांची शोधाशोध सुरु करण्यात आली. शोध घेतला जात असताना या तिघांचे मृतदेह विहिरीत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच गावकरी देखील या विहिरीकडे धावले. ही घटना कौटुंबिक वादातून घडली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असला तरी ही आत्महत्या आहे की घातपात आहे ? या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत. लहानग्या लेकरांना घेवून तरुण मातेने अशा प्रकारे जीवन संपविल्याने जत तालुक्यात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.  लक्ष्मीच्या माहेरच्या कुटुंबात  ही घटना समजताच नातेवाईक धावत आले. मृतदेह शवचिकित्सेसाठी नेण्यात आल्यानंतर तेथे या नातेवाईकानी गर्दी केली होती. 


लक्ष्मीच्या माहेरच्या नातेवाईकानी या घटनेबाबत संशय व्यक्त केला आहे. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करीत तिघांचे मृतदेह ताब्यात घेण्यास  नकार दिल्याने बराच वेळ तणावाचे वातावरण निमाण झाले होते. आई आणि दोन कोवळ्या मुलांचे मृतदेह पाहून अनेकांच्या डोळ्यांना पाणी येत होते तर नातेवाईक आक्रोश करीत होते. (A pregnant mother with two small children committed suicide in a well) या घटनेत नेमके काय घडलेय हे पोलीस तपासात समोर येणार आहे. हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात आहे याचे उत्तर पोलिसांच्या तपासानंतर मिळणार आहे परंतु झालेल्या घटनेचा शोक परिसरात दिसून येत आहे. 

(A heartbreaking incident has taken place where a pregnant mother with her two toddlers jumped into a well and ended their lives.)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !