BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ ऑक्टो, २०२२

संघर्षाचा भडका ! पंढरपूर तालुक्यात रोखली उसाची तोडणी !

 


शोध न्यूज : साखर कारखानदारीविरुद्धचा संघर्ष आता अधिक भडकू लागला असून उस दर संघर्ष सामिनीने आज पंढरपूर तालुक्यातील उसाची तोडणी बंद पाडली आहे त्यामुळे संघर्षाचा हा भडका अधिकच भडकणार असल्याचे दिसत आहे.


'गांधीगिरी' चे प्रदर्शन करीत पंढरपूर येथे नुकतीच ऊस परिषद घेऊन उस परिषद घेवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या तसेच संघर्षाचा इशारा देत अनेक मागण्या देखील मांडण्यात आल्या. मनामध्ये प्रचंड खदखद असली तरी गांधीगिरीच्या मार्गाने पहिला इशारा देण्यात आला. आता मात्र संघर्ष समिती ही हळूहळू आक्रमक स्वरूप धारण करताना दिसून येऊ लागली असून आज पंढरपूर तालुक्यातील ऊसाच्या तोडी रोखण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे हा संघर्ष आता वाढत जाणार असल्याचे दिसत आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी आज तुंगत परिसरात सुरु असलेल्या ऊस तोडण्या बंद पाडल्या आहेत. 


यावर्षीच्या गळीत हंगामाच्या प्रारंभी अडीच हजार रुपयांची पहिली उचल कारखान्यांनी जाहीर करावी ही मागणी समितीने ऊस परिषदेत देखील केली होती आणि याच मागणीसाठी आता आंदोलनाचे पुढील पाऊल पडले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली, कोल्हापूर परिसरात उसाच्या तोडी बंद पाडल्या आहेत आणि आता त्याच धर्तीवर पंढरपूर तालुक्यात देखील सुरु करण्यात आलेली ऊस तोड संघर्ष समितीने रोखली आहे. दोन दिवसात आधीच हजाराची उचल कारखान्यांनी जाहीर करावी, आणि ती जर जाहीर केली नाही तर मात्र ऊस तोड बंद पाडू असा खणखणीत इशारा उस परिषदेत देण्यात आला होता. आणि आज अखेर हे कृतीत उतरले आहे. 


या हंगामात पहिली उचल अडीच हजार देण्यात यावी आणि अंतिम दर हा ३ हजार १०० रुपयांचा देण्यात यावा अशी मागणीच संघर्ष समितीने केलेली आहे. ऊस परिषदेतील मागणी आणि आंदोलनाचा इशारा याकडे कारखान्यांनी लक्षच दिले नाही आणि याची कसलीही दखल घेतली गेली नाही. (Cutting of sugarcane stopped in Pandharpur taluka) परिणामी समिती आता फडात आणि वाहतुकीची वाहने रोखण्यासाठी रस्त्यावर उतरली आहे.  


वाहतूक करू नका !

उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना देखील आज सबुरीने सांगत उसाची वाहतूक करू नका असे आवाहन करण्यात आले आहे.  ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूर येथे उसाची पहिली उचल जाहीर झाली नसतानाही ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना हात जोडून, हार घालून, पाया पडून विनंती करण्यात येत आहे.  शेतकऱ्यांना ऊस शेती परवडत नाही, शेतकऱ्याच्या कामाला दाम मिळवून देण्यासाठी ऊस दर संघर्ष समितीने आंदोलनाची हाक दिली आहे,  अनेक वेळा विनंती करूनही ट्रॅक्टर मालक ऐकायला तयार नाहीत त्यामुळे आज पंढरपूर येथे गांधीगिरीने या ट्रॅक्टर मालकांना हार घालून विनंती करण्यात येत आहे असे ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.


ही शेतकऱ्यांची पोरं ?

उस दर संघर्ष समितीने आज ठिकठिकाणी उसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवून गांधीगिरीने उस वाहतूक न करण्याबाबत आवाहन केले आहे. हात जोडत, गांधीगिरीने सत्कार करीत समितीने हे आवाहन केले आहे. अर्थातच ही पहिली पायरी असण्याची शक्यता असून वाहतूक सुरुच राहिली तर मग वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा सोडण्यापासून अन्य प्रकार होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ट्रॅक्टर मालक ही देखील शेतकऱ्यांची पोरं असल्याचे दाखले देण्यात येत आहे परंतु समितीने 'यांना शेतकऱ्याची पोरं कसं म्हणायचं ? असा सवाल उपस्थित केला आहे. 


ट्रॅक्टरचे नुकसान करू नका, टायर फोडू नका, ती शेतकऱ्याची पोरं आहेत असे अनेकजण संघर्ष समितीला सांगत आहेत परंतु वारंवार आवाहन करून, विनंती करून, हात जोडून, पाय धरूनही हे ट्रॅक्टर मालक शेतकऱ्यांना दर मिळावा यासाठी  का थांबत नाहीत ? ही शेतकऱ्याची पोर आहेत तर मग उसाला दर मिळण्यासाठी ऊस वाहतूक का थांबवत नाहीत ?  मग यांना शेतकऱ्याची पोरं कसं म्हणायचं ? असे सवाल संघर्ष समितीने विचारले आहेत. एकूणच येत्या काही दिवसांत हे आंदोलन आता उग्र स्वरूप घेण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली असून तशी चिन्हेही दिसू लागली आहेत.

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !