शोध न्यूज : लाचखोरांची असंवेदनशिलता पुन्हा एकदा समोर आली असून मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यासाठी लाच घेताना सरपंच आणि ग्रामसेवक रंगेहात पकडले गेले आहेत.
लाचखोराना केवळ फुकटचे पैसे दिसतात, समोरच्या व्यक्तीची वेळ आणि परिस्थिती याच्याशी त्यांना काहीच देणेघेणे नसते हे पुन्हा दिसून आले आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी लाचेच्या मोहात पडून नेहमीच गोत्यात येताना दिसतात पण अलीकडे लोकप्रतिनिधी देखील या घाणीत बरबटताना दिसू लागले आहेत. ग्रामपंचायतीचे काही सरपंच आत्तापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत आणि आता पुन्हा एक सरपंच आणि ग्रामसेवक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात रंगेहात अडकले आहेत.
विविध विकास कामात ग्रामसेवक आणि सरपंच कशी लाच घेतात हे अनेकदा समोर आलेच आहे पण आता मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यासाठीसुद्धा लाचेची मागणी करण्यात आली आणि ती स्वीकारली पण या फुकटच्या पैशाच्या मोहात सरपंच आणि ग्रामसेवक यांना तुरुंगात जाऊन बसण्याची वेळ आली आहे. मावळ मधील कुसगाव खुर्द येथील सरपंच अनिल येवले आणि ग्रामसेवक अमोल थोरात यांना लाच प्रकरणी रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे. मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यासाठी आठ हजार रुपयंची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्यानंतर मावळ परिसरात याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
आपल्या चुलत आजी आजोबाच्या मृत्यूचे दाखले मिळावेत म्हणून तक्रारदाराने ग्रामपंचायतीकडे लेखी अर्जाद्वारे मागणी केली होती. अशा कामासाठी देखील सरपंच अनिल बाळू येवले (वय ३३) याने दहा हजार रुपयांची मागणी केली तर ग्रामसेवक अमोल तात्यासाहेब थोरात याने यासाठी प्रोत्साहन दिले. ज्यांनी सरपंचपदाच्या खुर्चीत बसवले त्यांनाच मृत्युच्या दाखल्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. दहा हजाराच्या रकमेत तडजोड करून शेवटी हा सौदा आठ हजार रुपयावर निश्चित झाला परंतु अशी लाच देणे मनाला न पटल्याने तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला आणि दोघांच्या विरोधात आपली तक्रार दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी पडताळणी केली आणि या पडताळणीत लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी एसीबीने सापळा लावला. (Bribery case sarpanch, gramsevak arrested) आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात सापडताच या दोन्ही लाचाखोराना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून सरपंच आणि ग्रामसेवक या दोघानाही अटक करण्यात आली आहे. गावाचा सरपंच देखील गावातील व्यक्तीच्या किरकोळ कामासाठी लाचेची मागणी करतो आणि ती स्वीकारतो याची चर्चा केवळ गावातच नव्हे तर परिसरात सुरु झाली आहे.
==============================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !