BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ ऑक्टो, २०२२

माढा - पंढरपूर तालुक्यातील रस्त्यांची पावसाने लावली "वाट" !




शोध न्यूज : आधीच व्यवस्थीत नसलेल्या पंढरपूर तालुक्यातील रस्त्यांची पावसाने वाट लावली असून लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार गावागावातून होताना दिसत आहे. 


पंढरपूर तालुक्यातील रस्ते कधीच धड नसतात त्यात काही गावांना जाण्यासाठी आजही व्यवस्थित रस्ते नाहीत. निवडणुकीच्या कालावधीत भली मोठी आश्वासने दिली जातात आणि लोक पाच वर्षे केवळ या आश्वासनांचा जप करीत राहतात. पुन्हा पुढची  निवडणूक आली की त्याच रस्त्यांची आश्वासने दिली जातात अशी परिस्थिती काही गावात आहे. नदीच्या परिसरात असलेल्या गावांचे रस्ते तर वाळू वाहतूक करणाऱ्या जड वाहनांनी खड्यात घातलेले आहेत. रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले तरी त्याकडे प्रशासन पहात नाही की लोकप्रतिनिधी ऐकून घेत नाही अशी अवस्था नेहमीचीच आहे. एकीकडे सिमेंटचे चकाचक रस्ते पाहायला मिळतात तर खेडोपाडी जाण्यासाठी कसरत करावी लागते. अशा रस्त्यामुळे अपघाताची टांगती तलवार सतत लटकलेली असते. फलटणमार्गे रेल्वेची चर्चा होते पण खेड्यातल्या रस्त्याबाबत मात्र कुणी बोलताना दिसत नाही. 


पंढरपूर शहरात तर बहुतेक सर्व रस्ते खड्डेयुक्त झाले असून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे तर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अगदीच बिकट झाली आहे.  पंढरपूर तालुक्यातील ४२ गावे माढा मतदारसंघात येतात. या गावांच्या रस्त्यांची तर अत्यंत दयनीय अवस्था आहे. ही समस्या मोठी असली तरी याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने संतापलेले गावकरी आणि शेतकरी आता आंदोलनाची भाषा करू लागले आहेत. पावसाळा संपल्यावर जर हे रस्ते दुरुस्त केले गेले नाहीत तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा भोसे परिसरातील गावकरी देवू लागले आहेत. शेतकरी आणि गावकरी यांचा जीव या रस्त्याने मेटाकुटीला आणलेला आहे असा आक्रोश हे गावकरी करू लागले आहेत. 


पंढरपूर तालुक्यातील विशेषतः भीमा नदी काठच्या गावांना जोडणाऱ्या एकाही रस्त्याची मागील दहा वर्षात साधी मलमपट्टी सुध्दा करण्यात आलेली नाही. फक्त मार्चअखेर आला की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्याचे सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. परिणामी भोसे परिसरातील भोसे - शेवते - पटवर्धन कुरोली, भोसे - खेडभोसे, शेवते - खेडभोसे, आवे - नांदोरे, नांदोरे - पेहे - करकंब, शेवते - पेहे, भोसे - नेमतवाडी, भोसे - मेंढापूर- रोपळे - येवती या रस्त्यांची पुरती चाळण झाली आहे.  भोसे परिसरातील रस्त्यांना दुरुस्ती, डागडुजीचा मुहूर्त लागत नसला तरी चार पाच  वर्षांपूर्वी उद्घाटन केलेल्या रस्त्यांची कामेही अधिकारी आणि ठेकेदारांच्या हातमिळवणीमुळे रखडली आहेत. शेवते - देवडे, शेवते - पटवर्धन कुरोली, भोसे - मेंढापूर या रस्त्यांची कामे मागील ४ ते ५ वर्षांपासून सुरूच आहेत. ती कधी पूर्ण होतील याचे उत्तर कुठेच मिळत नाही.


माढा विधानसभा मतदारसंघाला पंढरपूर तालुक्यातील ४२ गावे जोडल्यानंतर रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत गरजा पूर्ण होतील अशी आशा होती, त्यातही पाणी आणि विजेची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत, मात्र रस्त्यांची परिस्थिती जैसे - थे अशीच राहिली आहे. (Bad condition of roads in Madha, Pandharpur taluka) लोकप्रतिनिधींना जनतेच्या समस्यांचा विसर पडल्यामुळे जिल्हा परिषदेचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही रस्त्यांच्या तक्रारींची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.


खासदारांना पाहिलेच नाही...

पंढरपूर तालुक्यातील ४२ गावे माढा मतदार संघात समाविष्ठ आहेत आणि या गावात खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांच्याबाबत प्रचंड नाराजी निर्माण झालेली दिसत आहे.  आम्ही हे खासदार पहिलेच नाहीत अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा मतदारसंघात दिसलेच नाहीत, त्यामुळे रस्त्याच्या दुरावस्थेचे गाऱ्हाणे त्यांच्या कानावर घालायचे तरी कसे ? असा सवाल आता गावकरी विचारू लागले आहेत. 


(The roads in Pandharpur taluka, which are not already maintained, are waiting for the rains, but complaints are coming from villages that the people's representatives are ignoring them.)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !