BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ ऑक्टो, २०२२

शंभर खोके, नाही झाले ओक्के ! आमदार खरेदी करताना रंगेहात अटक !


शोध न्यूज : 'पन्नास खोके, एकदम ओक्के' या घोषणेने महाराष्ट्र दुमदुमत असतानाच शंभर खोक्याचे प्रकरण समोर आले असून एवढी मोठी लाच देताना तिघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. पकडलेल्या व्यक्ती या केंद्रीय मंत्री यांच्या जवळचे असल्याचे म्हटले आहे.


महाराष्ट्रात शिवसेना फोडून चाळीस आमदार बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्षाशी संधान बांधून राज्यात सरकार स्थापन केले. फुटलेल्या आमदारांना गद्दार म्हणून हिणवले जात आहेच पण पन्नास खोके घेवून ही गद्दारी केली जात असल्याचा आरोप सतत होत आहे. या पन्नास खोक्याच्या आरोपामुळे पन्नास आमदार टीकेचे धनी ठरले असून जाईल तेथे 'पन्नास खोके, एकदम ओक्के' असे म्हटले जात आहे. विरोधक हे आरोप करीत असतानाच सत्तापक्षाच्या बाजूने असलेल्या आमदार रवी राणा यांनी देखील हा आरोप केला आहे. गुवाहाटीला जाऊन अशी खोकी घेतल्याची सडेतोड टीका आमदार राणा यांनी केल्यानंतर शिंदे गटासोबत  गुवाहाटीला गेलेले आमदार बच्चू कडू हे संतापले असून त्यांनी काही आमदारांना घेवून वेगळा विचार करण्याचा इशारा कालच दिला आहे. खोक्यांचा हा विषय आगामी विधानसभा निवडणुकीत निर्णायक वळणावर जाण्याची शक्यता आहे. 


महाराष्ट्रातील पन्नास खोक्यांचा विषय आणि त्यातील सत्यासत्यता काहीही असो पण तेलंगाना राज्यात मात्र शंभर कोटींनी प्रचंड खळबळ उडवून दिली असून ही खळबळ देशपातळीवर जाऊ लागली आहे. तेलंगणामधील मोइनाबाद येथे टीआरएस पक्षाच्या चार आमदारांना लाच देताना भाजपच्या नेत्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.  भाजपच्या या नेत्यांकडून ,मोठी  रक्कम जप्त देखील करण्यात आली आहे. आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात असताना टाकलेल्या छाप्यावेळी पायलट रोहित रेड्डी, बिरम हर्षवर्धन रेड्डी, रेग कंथाराव, गुव्वाला बलराज हे आमदार फार्म हाउसवर उपस्थित होते. टीआरएस पक्षाच्या आमदारांना पैसे आणि पदाचे आमिष दाखवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून त्यांनी छापा टाकला. 


रंगा रेड्डी यांच्या फार्म हाउसवर टाकण्यात आलेल्या छाप्याप्रकरणी टीआरएस पक्षाचे आमदार पायलट रोहित रेड्डी यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर मोईनाबाद पोलिसांनी रामचंद्र भारती, नंदा कुमार आणि सिंह्याजी स्वामी या तिघांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड विधान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीचे रामचंद्र भारती आणि हैद्राबाद येथील नंदा कुमार यांनी आपल्याला भेटून भाजपमध्ये सामील होण्याची ऑफर दिल्याचे फिर्यादी रोहित रेड्डी यांनी म्हटले आहे. (Attempt to buy MLA, leaders arrested red-handed) आता या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु झाली असून देशभर या घटनेने खळबळ उडवून दिली आहे.    


शंभर खोके ---

हा विषय पन्नास नव्हे तर शंभर खोक्यांचा असल्याचे सांगितले जात आहे. टीआरएस आमदारांनी आम्हाला घोडेबाजार होणार असल्याची माहिती दिली होती त्यामुळेच आम्ही छापा टाकला असल्याची माहिती सायराबाद पोलीस आयुक्त स्टीफन रवींद्र यांनी दिली आहे. अजीजनगर येथील फार्म हाऊसवर छापा टाकला गेला तेंव्हा आम्हाला रोख रक्कम आणि धनादेश देखील सापडले आहेत. आमदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांचा सौदा झाला असता असे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.  


प्रत्येकी पन्नास कोटी ! 

हैदराबाद येथे आलेल्या तीन लोकांचे अनेक दिवसांपासून संबंधितांशी बोलणी सुरु होती. त्यात पी रोहित रेड्डी यांच्यासोबत त्यांनी १०० कोटींची डील केली होती. प्रत्येक आमदारास ५० कोटी रुपये देण्याचे कबुल करण्यात आले होते.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ताब्यात घेतलेल्यात  हरियानातील फरीदाबाद येथील सतीश शर्मा उर्फ रामचंद्र भारती, तिरुपतीचे के डी सिंह्याजी यांचा तर अन्य एक व्यावसायिक नंदा कुमार यांचा समावेश आहे. आमदार फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून करोडो रुपयांसह मोठी ऑफर देण्यात आली असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.  


पंधरा कोटी जप्त !

हा खरेदीचा सौदा शंभर कोटींचा  असला तरी पोलिसांनी त्यातील पंधरा कोटी रुपये जप्त केले असल्याचे सांगितले आहे. भारतीय जनता पक्षावर मोठा आणि गंभीर आरोप करण्यात येत असला तरी भाजपकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले आहेत. तेलंगणामधील सत्ताधारी पक्षानेच हे नाटक रचले असल्याचे म्हटले आहे. टीआरएस पक्षाचे सोशल मीडिया समन्वयक सतीश रेड्डी यांनी मात्र या प्रकरणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !