BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ ऑक्टो, २०२२

हत्या, दंगलीच्या गुन्ह्यातील आरोपीचा भाजपात प्रवेश !

 


शोध न्यूज : खून, दंगलीसह ११ गुन्हे दाखल असलेल्या माजी नगरसेवकाने सुसंकृत पक्ष म्हणवून घेत असलेल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून भाजपच्या जेष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात हा प्रवेश सोहळा संपन्न झाला आहे. 


भारतीय जनता पक्ष हा स्वत:ला सुसंकृत आणि इतरांपेक्षा वेगळा पक्ष असल्याचे म्हणवून घेतो. इतर पक्षातील गुन्हेगारीबाबत भाजप नेहमीच आरोप करीत असतो. नेत्यांवर असलेल्या गुन्ह्याचे भांडवल करीत टोकाचे आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षातील या प्रवेशाने राज्याच्या राजकारणात चर्चेला एक नवा आणि तितकाच धक्कादायक विषय मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपला विरोधक 'वाशिंग मशीन' म्हणून हिणवत असते. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते भाजपात गेले की त्यांच्यावरील टीका देखील बंद होते आणि या नेत्याचे गुणगान सुरु होते असे अनेक प्रकार गेल्या काही वर्षात समोर आले आहेत. 


भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ईडी चौकशा सुरु झाल्या आणि हेच नेते भाजपात गेले की त्यांच्यावरील कारवाया थंडावल्या असल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्राने पहिली आहेत. भाजप हा आता पूर्वीचा पक्ष राहिलेला नाही असे आरोप देखील होत असतात त्यामुळे या पक्षाच्या प्रतिमेला धक्का लागलेलाच आहे. अशातच हत्या, दंगल अशा प्रकारचे ११ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चंद्रपूरच्या माजी नगरसेवकाचा भाजप प्रवेश अनेकांना धक्का देणारा ठरू लागला आहे. माजी नगरसेवक अजय सरकार याच्या भाजप प्रवेशाने राजकीय वर्तुळात देखील प्रचंड खळबळ उडाली आहे.


शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर इनकमिंगचे वारे जोरात वाहू लागले असतानाच ११ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अजय सरकार या माजी नगरसेवकाने भाजपचे जेष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. अत्यंत थाटामाटात पक्षप्रवेशाचा हा सोहळा संपन्न झाला आहे पण तितकीच टीका देखील भाजपवर होऊ लागली आहे. स्थानिक पातळीवर देखील मोठे आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. गेल्या पाच वर्षात चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे आणि महिनाभरात मनपाची निवडणूक आहे त्यामुळे भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. यातच हत्या, दंगली अशा प्रकारचे अकरा गुन्हे असलेल्या माजी नगरसेवकाला भाजपने दिमाखात प्रवेश दिला आहे. मागील वर्षात टोळीयुद्धसदृश्य अनेक प्रकरणात या माजी नगरसेवकाचा सहभाग राहिला आहे शिवाय गंभीर गुन्हे नावावर आहेत तरी देखील भाजपसारख्या पक्षात त्यांचा प्रवेश झाल्याने अनेकांना हे धक्कादायक वाटू लागले आहे.


मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाला असला तरी स्थानिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशा व्यक्तीला भाजपने प्रवेश दिलाच कसा ? असा सवाल स्थानिक नागरिक विचारू लागले आहेत. राजकीय वर्तुळात देखील आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे, (Accused in the crime of murder, riots joins BJP)  अजय सरकार यांचे विशिष्ठ भागात मोठे वर्चस्व आहे त्यामुळे भाजपला निवडणुकीत याचा फायदा दिसत असला तरी सामान्य नागरिक मात्र दुरावले जाण्याची शक्यता दिसत आहे.   





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !