BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ ऑक्टो, २०२२

विधानसभेच्या निवडणुकीला आ. शहाजीबापू पाटील घाबरले ?

 



शोध न्यूज : काय झाडी, काय डोंगार म्हणत प्रसिद्धी मिळाली खरी पण आता सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे विधानसभा निवडणूक लढविण्यास घाबरले की काय ? असा सवाल आणि चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 


शिवसेनेतून शिंदे गटाने बंड केले आणि भाजपशी जवळीक करून सत्तेत आले. शिवसेनेतून फुटून गेलेल्या चाळीस आमदारात सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे अग्रभागी तर होतेच परंतु तेंव्हापासून त्यांनी सतत शरद पवार आणि ठाकरे कुटुंब यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. सांगोल्यात दीपक साळुंखे यांनी कान टोचले तेंव्हा 'यापुढे आपण शरद पवार यांच्यावर टीका करणार नाही' असे म्हणत त्यांनी चार पावले मागे घेतली. ठाकरे कुटुंबावर मात्र त्यांची टीका सतत सुरु असल्याने ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या टार्गेटवर आधीच आले आहेत आणि शहजीबापू पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लक्ष्मण हाके यांच्यासारखा आघाडीचा नेता शिवसेनेत दाखल झाला असून त्यांनी शहाजी पाटील यांचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. 


शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांना सत्ता, मंत्रीपद मिळाले असले तरी त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनमत गमावले असल्याचे दिसत असून शिवसैनिकांनी त्यांच्या पराभवासाठी कंबर कसलेली आहे. गद्दार म्हणून या आमदारांची संभावना सुरु आहे. त्यात शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचा प्रचंड रोष आहे. शिवाय सांगोला मतदार संघातून आ. पाटील हे अत्यंत मोजक्या मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे आधीच सांगोल्याचे जनमत त्यांना नाही आणि त्यात बंडखोरी केली आणि पुन्हा सतत टीका करून रोष ओढवून घेतला आहे. सहकार शिरोमणी वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या भागातून त्यांना चांगली मते मिळाली होती पण काळे यानाही नकळत दुखावण्याचे काम आ. पाटील यांनी नुकतेच केले आहे. 


शिवसेनेतून केलेल्या बंडखोरीमुळे आ. पाटील पुढच्या विधानसभा निवडणुकीत निवडून येणार नाहीत असा अनेकांचा होरा असताना आता याची जाणीव शहाजीबापू पाटील यानाही झाली की काय ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण विधानसभा निवडणूक लढविण्यास ते इच्छुक नसल्याचे संकेत त्यांनीच दिले आहेत. "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील ... ओक्के" हे सगळं झालं खरं पण आता भविष्य काही ओक्के नाही असेच दिसत आहे. आ. शहाजीबापू पाटील यांनी आज पंढरपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानावरून बापूंनी लढाईच्या आधीच शस्त्र खाली टाकली की काय ? असा सवाल आता विरोधक विचारू लागले आहेत. आ. पाटील यांनी विधानसभेऐवजी आपल्याला विधानपरिषदेवर पाठवावे अशी गळ भाजप नेत्यांना घातली आहे. सांगोला विधानसभा मतदार संघातून विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्यासारखेच विधानपरिषदेवर पाठवा" अशी जाहीर मागणी आ. पाटील यांनी करून प्रवीण दरेकर यांना गळ घातली आहे. 


बापूंच्या या एका विधानावरून राजकीय वर्तुळात बरेच अर्घ काढले जाऊ लागले असून बंडखोर आमदारांना मतदार स्वीकारणार नाहीत असे विरोधक आधीपासूनच म्हणत आहेत, त्यात आता शिंदे गटातील म्होरके आमदार शहाजीबापू पाटील हेच निवडणुकीपासून पळ काढताना दिसू लागले आहेत. विधानसभा निवडणूक ही 'काय झाडी, काय डोंगार' म्हणण्याएवढी सोपी नसतेच आणि त्यात शहाजीबापू हे मोजक्या मतांनी निवडून आलेले आमदार आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी बंडखोरी केल्याने आणखी अडचण निर्माण होणार हे उघड आहे. अशीच परिस्थितीत चाळीस आमदारांत अनेकांची होण्याची शक्यता आहे. (MLA Shahajibapu Patil is afraid of assembly elections) आ. पाटील यांनी आज केलेले विधान हे विरोधकांसाठी आयते कोलीत मिळाले असून बापू आत्ताच विधानसभेपासून पळून निघाले काय ? असा सवाल केला जाऊ लागला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात देखील या विधानाची आणि आमदार पाटील यांच्या भूमिकेची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. 



  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !