BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ सप्टें, २०२२

चोर पळाले, चोरीचे चंदन मात्र सापडले !

 



शोध न्यूज : सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातील चोरलेले चंदन पोलिसांच्या हाती लागले पण अंधाराचा फायदा घेत चोर मात्र चंदन टाकून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत


सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षाक्ष तेजस्वी सातपुते यांच्या सोलापूर येथील निलगिरी बंगल्यातून चंदनाची झाडे कापून चंदनचोरांनी चंदनाची चोरी केली होती. पोलीस अधीक्षक यांच्याच बंगल्यात शिरून, तेथील चंदनाची झाडे कापून बुंधे पळवून नेण्यापर्यंत या चोरट्यांची मजल गेली होती. यामुळे आश्चर्य तर व्यक्त होतच राहिले पण चोरांचे मनोधैर्य किती वाढले आहे याचीही प्रचिती येऊन गेली आहे. हे चंदनचोर पोलिसांच्या हाती येणार हे उघड असतानाच पोलिसांच्या नजरेने या चंदनचोरांना हेरले. चोर मात्र अंधाराचा फायदा घेत पोलिसांच्या नजरेतून निसटले. त्यांनी चोरलेले चंदन मात्र पोलिसांच्या हाती लागले आहे. 


पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या बंगल्यातून झालेल्या चंदन चोरीबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पहाटेच्या दरम्यान पोलीस पीसीआर वाहनातून जात असताना त्यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूने एक दुचाकी येताना दिसली. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी दुचाकीस्वाराला हटकले आणि गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यानुसार ते गाडी बाजूला घेवू लागले पण याचवेळी त्यांनी तेथून पळ काढला. पोलीसही त्यांच्या मागे धावले पण अंधाराचा फायदा घेत दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. 


चोर तेथून निसटण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांची दुचाकी जागेवरच राहिली. या दुचाकीला चंदनाच्या झाडांचे तीन बुंधे आणि फांद्या बांधलेल्या होत्या. चंदनासह पोलिसांनी हे दुचाकी पोलीस ठाण्यात नेली. तेथे गाडीची तपासणी करतांना त्यांना गाडीच्या सीटच्या खालच्या बाजूला एक करवत आणि अन्य काही साहित्य देखील आढळून आले आहे. पळालेले चोर हे सराईत गुन्हेगार असून शहरातील अन्य काही चोऱ्या याच चोरांनी केल्या असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी चोरीचे चंदन जप्त केले असून त्याची किंमत सात लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.


दुचाकीवरून जात असताना या चोरांनी चंदनाच्या झाडांचे बुंधे दोघांच्या मध्ये ठेवलेले होते आणि फांद्या पांढऱ्या रंगाच्या एका पोत्यात झाकलेल्या होत्या. पोत्यावर एक जॅकेट झाकलेले होते. या सर्व परिस्थितीमुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी हटकले. पोलिसांनी हटकताच 'आपण पकडले गेलो' याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी दुचाकी बाजूला घेण्याचा बहाणा करीत तेथून धूम ठोकली. त्यांची गाडी आणि चोरलेले चंदन पोलिसांनी जप्त केले असून पोलीस चोरांचा शोध घेत आहेत. लवकरच पोलीस चोरांच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे. 


जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या 'निलगिरी' बंगल्यातून चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची घटना निदर्शनास आली होती. पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्यात शिरून चंदन चोरी करण्याचे अजब धाडस या चोरटयांनी केले पण त्यांची ही चोरी अधिक काळ लपून राहिली नाही. लाईटचे बटन बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कापलेले चंदनाचे एक झाड दिसले होते आणि त्यांनी अधिक पाहणी केली तेंव्हा चंदनाच्या तीन झाडाची चोरी झाल्याचे दिसून आले होते. झाडांचे बुंधे घेऊन चोर पसार झाले होते आणि याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बंगल्याच्या परिसरात पोलिसांचा मोठा वावर असणे स्वाभाविक आहे. (The stolen sandalwood was found, but the thief escaped) असे असतानाही या चोरांनी येथेच चोरी करण्याचे धाडस केले आणि चंदनाची झाडे कापून चोरी करण्यात ते यशस्वी देखील झाले. परंतु अशा ठिकाणी चोरी करणे महागात पडणार याची जाणीव आता नक्कीच चोरांना झाली असेल !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !