BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ सप्टें, २०२२

'आई' होण्यासाठी महिलांची रेकॉर्डब्रेक गर्दी !

 



शोध न्यूज : 'आई' होण्यासाठी महिलांची विक्रमी गर्दी झाल्याचा पहिला अनुभव मंगळवेढ्यात आला असून वंध्यत्वाची समस्या किती वाढू लागली आहे याचेच दर्शन या गर्दीत झाले. 


मातृत्वाशिवाय स्त्रीत्व अपुरे असते असे मानले जाते. प्रत्येक महिलेला आई होण्यात जो आनंद असतो त्या आनंदाची तुलना आयुष्यातील अन्य कुठल्याही आनंदाशी होत नाही. परंतु अलीकडे वंध्यत्वाचे प्रमाण वाढताना दिसत असून आई होण्यापासून हे वंध्यत्व रोखत असते. त्यामुळे असे प्रत्येक जोडपे उदास होते आणि वाट्टेल ते प्रयत्न करू लागतात. कितीही पैसा गेला तरी पर्वा नसते परंतु एखादे तरी अपत्य पदरी असावे ही अनावर इच्छा असते. विविध डॉक्टराकडून उपचार घेतले जातात, कुणाला यश येते तर कुणाच्या आयुष्यात ही निराशा कायम असते. कुणाला कधी कधी अत्यंत उशिरा अपत्यप्राप्ती होत असते. मंगळवेढा येथील एका शिबिरात आई होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. 


श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती येथे सेवा देत असलेले आणि मुळचे मंगळवेढा तालुक्यातील असलेले डॉ. दत्तात्रय पाटील यांनी मंगळवेढ्यात मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन केले होते. वीरशैव मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या या शिबारात आई बाबा होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांनी विक्रमी गर्दी केली. एका दिवसाच्या या शिबिरास सातारा, सोलापूर पासून दूर दूरवरून महिला पुरुष सहभागी झाले होते. डॉ. दत्तात्रय पाटील यांचे चांगलेच नाव असल्यामुळे लोकांनी मोठी गर्दी केली. या शिबिरात १७५ जोडप्याना डॉ. पाटील यांनी व्यक्तिगत सल्ला दिला पण अनेकांना निराश होऊन परतावे लागले. एक दिवसाचे मोफत शिबीर आणि गर्दी मात्र मोठी त्यामुळे सर्वांनाच या शिबिराचा फायदा घेता आला नाही.  

     

मंगळवेढा तालुक्यातील येड्राव डॉ दत्तात्रय पुरुषोतम पाटील . यांचे शिक्षण मंगळवेढा, पंढरपूर, पुणे अशा ठिकाणी झालेले असून मरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांनी चार वर्षे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली आहे. नंतर शासकीय कोट्यामधून एम डी साठी सातारा येथे निवड झाली.  टेस्ट ट्युब बेबी, सोनोग्राफी, गर्भपिशवी तक्रारी संदर्भात स्पेशल ट्रेनिग पूर्ण केले आणि महत्वाचे म्हणजे कोरोना कालवधीत  'स्त्रीरोग व प्रसुती' मध्ये सातारा येथे एम डी  मध्ये महाराष्ट्रात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सध्या ते  चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटर बारामती येथे कार्यरत आहेत परंतु जन्मभूमीत सेवा द्यावी या भावनेने त्यांनी मंगळवेढा येथे मोफत शिबिराचे त्यांनी आयोजन केले. तब्बल १७५ जोडप्यांना याचा  फायदा झाला पण वाढलेल्या गर्दीमुळे अनेकांची निराशा देखील झाली. शिबिराची नियोजित वेळ दुपारी ३ वाजेपर्यंत होती पण गर्दीमुळे रात्री आठ वाजेपर्यंत शिबीर सुरूच राहिले. 


शिबिरासाठी १४ ते १५ जणांचा ताफा सज्ज होता. पथकातील सर्वच अधिकारी शिबिरात आलेल्या जोडपांची आदराने विचारपूस करीत होते त्यामुळे या शिबिरात एक कौटुंबिक वातावरण तयार झाले होते. ( Record-breaking crowd at Dr. Dattatray Patil infertility camp)  शिबिरार्थीसाठी केळी आणि चहा अशी व्यवस्था देखील करण्यात आली होती. डॉ. पाटील यांनी विविध ठिकाणी अशी शिबिरे आयोजित केली आहेत पण हे शिबीर मात्र रेकॉर्डब्रेक झाल्याची माहिती डॉ. दत्तात्रय पाटील यांनी दिली.  गर्दीमुळे अनेकांना संधी न मिळाल्याने असेच शिबीर पुन्हा लवकरच घेण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. पाटील यांनी दिली.      



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !