BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ सप्टें, २०२२

बंडखोर आमदारांच्या पोस्टरची गाढवावरून धिंड !


शोध न्यूज : बंडखोर आमदारांच्या बाबतीत शिवसेना आता अधिकच उग्र होऊ लागली असून सोलापुरात आज तीन बंडखोर आमदारांच्या पोस्टरची गाढवावरून धिंड काढून आपला आक्रमक इरादा सोलापूर शिवसेनेने जाहीर केला.


एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार यांनी शिवसेनेतून फुटून भाजपशी हातमिळवणी केल्यापासून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष सतत वाढतच चाललेला आहे. पातळी सोडून टीका टिपण्णी आणि राजकीय कुरघोडी होताना दिसत आहेच पण राजकीय पातळी एकदम खाली गेल्याचेही गेल्या तीन महिन्यात अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. शिवसेनेतील एकेकाळचे एकनिष्ठ म्हणवले जाणारे रामदास कदम, शहाजीबापू पाटील, गुलाबराव पाटील यांनी अलीकडे शिवसेना आणि व्यक्तिश: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबावर जहरी टीका करणे सुरु केले आहे. या टीकेचे पडसाद राज्यभर उमटत असून शिवसेना अधिकच आक्रमक होताना दिसत आहे. 


रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेली विधाने शिवसेनेला अजिबात रुचलेली नसून त्यामुळे राज्यात कदम यांच्याविरोधात शिवसैनिक संतप्त आणि आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारणे, पुतळा जाळणे अशी आंदोलने करून रामदास कदम यांचा निषेध होत आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथेही शिवसनेने रामदास कदम, शहाजीबापू पाटील यांच्या प्रतिमांना जोडे मारण्यात आले आणि आज सोलापुरात तर रामदास कदम, शहाजीबापू पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमांची गाढवावरून धिंड काढण्यात आली. यावेळी शिवसैनिक प्रचंड आक्रमक दिसत होते. शिवसैनिकांनी बंडखोरांच्या प्रतिमांना जोडे मारून आपला संताप व्यक्त केला. 


ज्या शिवसैनिकांनी या नेत्यांना हृदयात जपले, पूजा केली त्याच नेत्यांना याच शिवसैनिकाच्या रोषाला सामोरे जावे लागत असून कधीकाळी फुलांचे हार घातलेले हात आता त्याच नेत्यांच्या प्रतिमांना जोड्याने मारू लागले आहेत. (Photo of rebel MLAs beaten with shoes) शिवसेनेत बंडखोरी करून सत्ता मिळवली असेल पण काळजात जपणारे शिवसैनिक  मात्र या नेत्यांपासून दूर गेलेले आहेत हे मात्र पुन्हा पुन्हा आणि राज्यभर दिसून येत आहे. 

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !