BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ सप्टें, २०२२

-- तर विधानसभेत आत्महत्या करीन - आमदार नितीन देशमुख

 



शोध न्यूज : राज्यात पैशाने झालेल्या सत्तांतराचे आपण साक्षीदार आहोत, हे सिद्ध नाही केले तर विधानसभेत आत्महत्या करीन असे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी म्हटले असल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 


शिवसेनेतून फुटून चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. हे आमदार फुटले तेंव्हा आधी सूरत येथे गेले होते आणि तेथून गुवाहाटी येथे जाऊन त्यांनी काही दिवस मुक्काम ठोकला होता. यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख हे या गटातून परत आले होते आणि आपल्याला कसे नेले गेले आणि त्यांच्या तावडीतून आपण कशी सुटका करून घेतली याचे रसभरीत वर्णन आ. देशमुख यांनी केले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात बरीच खळबळ उडाली होती. शिंदे गटाने त्यांचे आरोप नाकारले होते पण आ. देशमुख हे आपल्या विधानावर कायम ठाम राहिले. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी धक्कादायक खुलासा केला असून धमकी देत आपल्याला नेण्यात आले होते अशी माहिती त्यांनी दिली आहे. 


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी लावण्याची आपल्याला धमकी देण्यात आली आणि अशी धमकी देवून आपल्याला सूरत येथे नेले. पैसे घेऊन सत्तांतर घडविण्यात आले आहे आणि बंडखोरी न केल्यामुळे आपल्याला एसीबी चौकशीची धमकी देण्यात आली होती. आपण अशा चौकशीला घाबरत नाही, खुशाल चौकशी होऊन जाऊ द्या, 'एसीबीची कशाला ? ईडी ची चौकशी लावा म्हणजे माझी इज्जत आणखी वाढेल आणि माझ्या मुलाला चांगले स्थळ येईल' असे आव्हानच आता आमदार देशमुख यांनी दिले आहे. पाच दिवसांपूर्वी आपल्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी लावली गेली आहे. "तुमचे काही असेल तर वर जाऊन भेटा' असे पोलीस महानिरीक्षकांनी आपल्याला सांगितले आहे असे आ. देशमुख यांनी म्हटले आहे.


  • पैशानेच राज्यात सत्तांतर झाले आहे, जर हे मी सिद्ध करून नाही दाखवले तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करीन असे स्फोटक विधान आमदार नितीन देशमुख यांनी केले आहे.

पन्नास खोके, एकदम ओक्के' असे जे बोलतात ते सत्य असून मागील दीड वर्षांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे कारस्थान सुरु होते. माज्यावर चुकीच्या कारवाया करायला लागले तर मी देखील गप्प बसणार नाही. माझ्याकडेही क्लिप आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तांतर घडविण्यात आले आहे, ज्यांनी हे घडवले त्यांच्याही क्लिप माझ्याकडे आहेत. (I will commit suicide in the assembly - MLA Nitin Deshmukh) असा इशाराच आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे त्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी उठाव केल्याचे सांगत आहेत पण त्यांच्याच आवाजातील क्लिप मी बाहेर काढून दाखवली तर त्यांना बोलायला जागा उरणार नाही" असेही आ. देशमुख यांनी म्हटले आहे.   


बंडखोरी नंतर पन्नास खोके घेतल्याचे बंडखोरांवर सतत आरोप होत आहेत. 'पन्नास खोके, एकदम ओक्के' हा विषय राज्यभर चर्चेचा झाला आहे आणि यामुळे शिंदे गटाची सतत कोंडी होत आहे. आम्ही अशी खोकी घेतली नाहीत असा काही आमदारांनी वेळोवेळी खुलासा केला आहे पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. शिवसेनेने तर पन्नास खोक्यांचा मुद्दा कायम प्रभावीपणे पुढे रेटला आहे आणि राज्यात सामान्य नागरिकांत देखील या खोक्यांची चर्चा सुरु आहे. आता तर बंडखोरी आणि सूरत, गुवाहाटीच्या प्रवासातील एक साक्षीदार आमदार नितीन देशमुख यांनीच मोठा गोप्यस्फोट केला आहे. आगामी काळात आणखी काय काय बाहेर येतेय ते पाहण्यासारखे असेल असे संकेत आता मिळू लागले आहेत.  

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !