BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० सप्टें, २०२२

मुख्यमंत्र्यांचा डुप्लिकेट विजय माने अखेर अडचणीत !

 



शोध न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डुप्लिकेट म्हणून चर्चेत आलेल्या पुण्याच्या विजय माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डुप्लिकेट मुख्यमंत्री बनण्याची हौस अखेर त्याचा अंगलट आली आहे. 


राज्यात सरकार बदलले आणि शिवसेनेतून फुटून भाजपासोबत गेलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि पुण्यातील त्यांच्या या डुप्लिकेट विजय माने याची चर्चा सुरु झाली. विजय माने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बरेच साम्य आहें त्यामुळे माने याला लोक सहज फसतात. न फसलेले लोक त्याच्याकडे कौतुकाने पाहतात. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून विजय माने हा भलताच प्रसिद्धीला आला आणि डुप्लिकेट म्हणून प्रसार माध्यमात देखील त्याचा बोलबाला झाला. तो देखील मुख्यमंत्री असल्याच्या अविर्भावात वावरू लागला पण हेच त्यांच्या अंगलट आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करीत पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा समाजात मलीन करण्याचा आरोप विजय माने याच्यावर करण्यात आला आहे. कुख्यात आरोपी शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आणि मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिमा मलीन केली शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा वेष परिधान करून अनेक ठिकाणी नाचण्याचा प्रकार विजय माने याने केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. (Duplicate Chief Minister Vijay Mane is finally in trouble)पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी विजय माने याच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार भारतीय दंड विधान कलम ४१९, ४६९, ५००, ५०१, ५११ नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करणाऱ्या विजय माने याने सराईत गुन्हेगार असलेल्या शरद मोहोळ याच्याबरोबर फोटो काढून तो समाज माध्यमावर व्हाराला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिवाय सोशल मीडियावरून तो 'आपणच मुख्यमंत्री' असल्याची तोतयेगिरी करीत आहे अशी देखील माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने माहिती घेतली असता त्यांना तशा प्रकारचा एक फोटो मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उभे असून सराईत गुन्हेगार हा खुर्चीत बसला असल्याचे भासवणारा हा फोटो आहे.शिवाय विजय माने हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखीच वेशभूषा करून विविध सार्वजनिक कार्यक्रमात जाऊन लोकांचा गैरसमज होईल अशा रीतीने वावरत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली आहे.


एकनाथ शिंदे याच्यासारखा हुबेहूब दिसत असलेला विजय माने हा गेल्या तीन महिन्यांपासून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. लोक त्याची चर्चाही करीत होते आणि गणेशोत्सवाच्या काळात या विजय माने याला काही 'सुपाऱ्या' मिळाल्याची देखील चर्चा होती. विविध गणेश मंडळाकडून त्याला गणपती आरतीसाठी निमंत्रणे मिळत होती. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्याचे दिवस बदलून गेले होते. विशेष म्हणजे त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून आपल्या परिसरातील काही समस्या देखील मांडल्या होत्या. अवघ्या काही दिवसात 'स्टार' बनलेल्या विजय माने याला तोतया मुख्यमंत्री बनणे अखेर महागात पडले आहे.  


माने भाजप पदाधिकारी ! 

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर विजय माने याने प्रतिक्रिया दिली असून गुन्हेगारासोबत काढलेल्या फोटोबाबत आपल्याला काही माहिती नाही. या फोटोबाबत आपणच पोलिसात गेलो होतो. आपण भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी आणि अभियंता आहे. असले काम आपण करणार नाही शिवाय गुन्हेगार शरद मोहोळ याला आपण ओळखत देखील नाही. लोक माझे फोटो व्हायरल करीत आहेत. अकारण आपल्याला अडकविण्याचा हा प्रयत्न आहे असे विजय माने याने म्हटले आहे.


   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !