BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ सप्टें, २०२२

पावसाचा जोर ! विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ !



शोध न्यूज : पुणे क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निमाण होऊ लागली असून खडकवासला धरणातून सोडण्यात येत असलेल्या विसर्गामुळे भीमा नदीला देखील मोठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता स्पष्ट होऊ लागली आहे. 


पुणे परिसरात सतत पाऊस होत असून आज सकाळ पासून जोरदार पाउस कोसळू लागला आहे. खडकवासला धरण शंभर टक्के भरलेले असल्यामुळे या धरणातून पाणी सोडले जात आहे. हा विसर्ग पुन्हा वाढविण्यात आला असून या विसर्गात दुपारनंतर आणखी वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मुठा नदीतील विसर्ग वाढला असून पुण्याच्या भिडे पुलावर पाणी आले आहे. या पाण्यामुळे भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असून नागरिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.   खडकवासला धरण साखळीत काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणातून पाणी सोडणे क्रमप्राप्त झाले आहे.


खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सतत वाढविला जाऊ लागला आहे चारही धरणे पूर्ण भरलेली असल्यामुळे आज सकाळी ११ वाजता १९ हजार २८९ क्युसेक्स पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे.  या धरण साखळीतील खडकवासला, पानशेत वरसगाव आणि टेमघर ही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत आणि या धरणाच्या क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्यात लक्षणीय वाढ होऊ लागली आहे त्यामुळे खडकवासला धरणातून दुपारी सुमारे २५ हजाराचा विसर्ग मुठा नदीत सोडला जाण्याची अधिक शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी योगेश भंडलकर यांनी सांगितले आहे. त्यानंतर मुठा नदीची पातळी आणखीच वाढणार आहे. 


काल संध्याकाळपर्यंत धरण परिसरात झालेल्या पावसाचे प्रमाण कमी होते. खडकवासला १ मिमी., पानशेत ७ मिमी, वरसगाव ८ मिमी तर टेमघर येथे १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून सोडला जात असलेला विसर्ग कमी करण्यात आला होता. १० हजार २४६ असा विसर्ग सोडला जात होता परंतु तो रात्री ९ वाजता कमी करून ६ हजार ८४८ एवढा करण्यात आला होता. परंतु रात्रीत जोरदार पाऊस झाला असल्याने विसर्ग वाढविणे आवश्यक ठरले.  खडकवासला - ९, पानशेत -३४, वरसगाव - ३६, टेमघर - ६५ मिमी असा पाऊस झाला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यातून ६ हजार ८४८ क्युसेक्स असणारा विसर्ग आज सकाळी ७ वाजता १० हजार २४६ एवढा करण्यात आला.


पानशेत धरणातून सोडला जाणारा २ हजार ६०४ क्युसेक्सचा विसर्ग वाढवून ३ हजार ९०८ करण्यात आला त्यामुळे खडकवासला धरणाचा विसर्ग वाढवून तो सकाळी १५ हजार २११ क्युसेक्स करण्यात आला आणि नंतर ११ वाजता तो १९ हजार २८९ एवढा करण्यात आला आहे. पुणे पाणलोट क्षेत्रातील पाउस आणि धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे उजनी धरणाची पातळी सतत वाढत असून उजनी धरण भरलेले असल्यामुळे येणारे पाणी भीमा नदीत सोडावे लागत आहे. परिणामी भीमा नदीची पातळी वाढत आहे. भीमा - नीरा खोऱ्यातील पावसामुळे आधीच वीर आणि उजनी धरणातून पाणी सोडले जात आहे. त्यात आता वाढच होत जाणार असल्याचे स्पष्ट आहे. 


उजनी धरणातून ५० हजार आणि वीर धरणातून २५ हजार विसर्ग भीमा नदीच्या पात्रात येत असून धरणात येणाऱ्या विसर्गात आणखी वाढ होणार आहे. यामुळे धरणातून सोडला जाणारा विसर्ग वाढण्याची अधिक शक्यता असून त्यामुळे भीमा नदीत पूर परिस्थिती अधिकच होण्याची चिन्हे दिसत आहेत.  (
Heavy rain! A large increase in discharge of dam) सद्याची आणि संभाव्य परिस्थिती विचारात घेवून नदीकाठच्या गावांनी सतर्क असण्याची गरज निर्माण झाली आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !