BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० सप्टें, २०२२

कुत्र्याने मटण खाल्ले म्हणून पित्याचा मुलीवर गोळीबार !

 




शोध न्यूज : कुत्र्याने मटण खाल्ले म्हणून बाप म्हणवून घेणाऱ्या एका नराधमाने आपल्याच तरुण विवाहित मुलीवर गोळीबार केला असून या गोळीबारात मुलीचा मृत्यू झाला आहे. 


कुठलाही बाप आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करीत असतो, तिच्यासाठी वाट्टेल तो त्याग करायची त्याची तयारी असते आणि तसा त्याग तो करीतही असतो. मुलीच्या पुढे जगातील सगळ्या गोष्टी त्याला कमी मोलाच्या वाटत असतात. परंतु तुळजापूर तालुक्यातून एक विपरीत घटना समोर आली असून अत्यंत किरकोळ कारणासाठी बापाने आपल्या तरुण मुलीचा जीव घेतला आहे. या घटनेने उस्मानाबाद जिल्हा हादरून गेला आहे. आपल्याच लेकराचा जीव घेणाऱ्या या बापाबध्दल प्रचंड संतापाचे पडसाद उमटू लागले आहेत. मुलीच्या जिवापेक्षा या बापाला मटण अधिक प्रिय होते हेच या घटनेने दाखवून दिले आहे.


काजल मनोज शिंदे असे या विवाहित मुलीचे नाव असून ती तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे माहेरीच रहात होती. काजलच्या वडिलाने घरी मटण आणले होते. काजलच्या आईने घरात मटण बनविले परंतु काजलचे दुर्लक्ष झाल्यामुळे हे मटण कुत्र्याने खाल्ले. कुत्र्याने मटण खाल्ल्यामुळे काजल आणि तिच्या आईमध्ये वादावादी झाली. हे भांडण सुरु असतानाच मद्यप्राशन करून आलेल्या बापाने नशेत गावठी बंदुकीने मुलीवरच गोळी झाडली. या गोळीबारात मुलगी गंभीर जखमी झाली. मुलीच्या छातीवरच गोळी झाडल्याने तिची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने तुळजापूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. 


या घटनेनंतर पोलिसांनी काजलचा वडील गणेश भोसले आणि आई मीराबाई भोसले या दोघानाही अटक केली आहे. काजलचा पती मनोज शिंदे यानाही काजलच्या आई वडिलांनी ठार मारण्याची धमकी दिली. (Father shoots daughter because dog ate mutton) मनोज शिंदे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अत्यंत किरकोळ कारणावरून आपल्याच विवाहित मुलीचा जीव घेणाऱ्या पित्याबाबत तालुक्यात प्रचंड संतापाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.  





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !