BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ सप्टें, २०२२

'ब्राह्मणांनी मराठ्यांची झोळी भरली' ! आरोग्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य !

 



शोध न्यूज : अनेकदा वादाची विधाने करणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा असेच विधान केले असून मराठा समाजही या विधानांवर संतापला आहे. माफी मागण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.


शिंदे गटातील नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे वादग्रस्त विधानाबाबत प्रसिद्ध आहेत. 'खेकड्यांमुळे धरण फुटले' अशा प्रकारचे त्यांनी केलेले एक विधान राज्यभर चर्चेचे ठरले होते.  त्यानंतर देखील त्यांच्या काही विधानावर चर्चा आणि वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. सावंत हे बोलताना आक्रमक बोलण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांच्या विधानाचे पडसाद उमटताना दिसतात. शिंदे गटातील अनेक मंत्री सद्या मंत्रीपद विसरून कायदा हातात घेण्याची भाषा करताना दिसतात. राज्याच्या शासनाची आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेलेच मारण्या- ठोकण्याची भाषा करू लागले आहेत. आमदार संतोष बांगर, मंत्री अब्दुल सत्तार यांची नुकतीच काही विधाने आली असताना सावंत यांनीही बीडमध्ये नुकतेच एक विधान केले. मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर बीडमध्ये येवून नागडं केल्याशिवाय राहणार नाही' असे वक्तव्य त्यांनी केले होते.

 

उस्मानाबाद येथे हिंदूगर्जना कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा असेच वादग्रस्त वक्तव्य केले असून याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. 'सत्तांतर झाले की विरोधकांना आता मराठा आरक्षणाची खाज सुटली', 'ब्राह्मणांनी मराठ्यांची झोळी भरली' असे वादग्रस्त वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. सत्तांतर झाल्यावरच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे, यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात, ओबीसी मधून पाहिजे, उद्या म्हणतील 'एससी' मधून पाहिजे. याचा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत आहे" असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. 


सावंत यांनी मराठा आरक्षणावरून विरोधकांना सुनावले आहे पण त्यांच्या या भाषेवरून वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या सरकारच्या काळात मराठा आरक्षण मिळेल पण या आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्याना ओळखण्याची गरज आहे असेही सावंत यांनी म्हटले आहे. परंतु 'मराठा आरक्षणाची खाज' 'ब्राह्मणांनी मराठ्यांची झोळी भरली' ही विधाने मराठा समाजाला देखील खटकू लागली असून त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहावे लागणार आहे. 'फडणवीस यांना ब्राह्मण म्हणून हिणवले गेले पण त्याच ब्राह्मणाने २०१७ साली मराठ्यांची झोळी भरली" असे विधान तानाजी सावंत यांनी केले आहे.


  • आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणतात, “ब्राह्मण म्हणून हिणवलं गेलं त्या माणसाला. अरे पण त्याच ब्राम्हणानं या मराठ्यांची झोळी २०१७-१८ ला भरली. मराठ्यांना आरक्षण दिलं. ते टिकलं. दोन तीन बॅचेस बाहेर आल्या. त्यांना नोकऱ्या मिळाल्या !”


तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय विरोधक त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील परंतु मराठा समाज मात्र 'ब्राह्मणांनी मराठ्यांची झोळी भरली' या विधानावर संतप्त होताना दिसत आहे. (Controversial statement of Health Minister Tanaji Sawant ) आपल्या आक्रमक शैलीबाबत प्रसिद्ध असलेल्या संभाजी ब्रिगेडकडून यावर काय उत्तर येतेय ते देखील पाहावे लागणार आहे परंतु सावंत यांनी हे विधान करून मराठा समाजालाच ललकारले असल्याची भावना मराठा  समाजात निर्माण झाली आहे. मराठा संघटनांकडून 'कडक' प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर करावी अन्यथा राज्यात फिरू देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.  


क्रांती मोर्चा आक्रमक !
सावंत यांच्या वक्तव्यावर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून 'सावंत, काय बोलताय? भान आहे का? अशा शब्दात जाब विचारून सावंत यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. मराठा समाजाच्या भूमिकेसोबत येत नसाल तर किमान विरोध तरी करू  नका, काहीही बोलले तरी मराठा समाज सहन करील असे तुम्हाला वाटते काय ? सकल मराठा समाजाची माफी मागा अशी मागणी करीत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक क्रांती केदार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !