BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ सप्टें, २०२२

'दसऱ्या' च्या धुण्याने घेतला बाप लेकाचा जीव !

 



शोध न्यूज : दसऱ्या च्या धुण्याने घटस्थापनेच्या आदल्या दिवशीच बाप लेकांचा जीव घेतल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून सणावाराच्या आनंदावर शोकाचे पांघरूण पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' अशा शब्दात दसऱ्याच्या सणाचे वर्णन करण्यात येते. गणेशोत्सव संपला की नवरात्र आणि दसरा सणाचे वेध लागतात. यंदाचा दसरा उजाडण्यापूर्वी आणि नवरात्री महोत्सव सुरु होण्या आधीच या आनंदाला ग्रहण लागले असल्याचे दिसत आहे. राज्यात विविध ठिकाणी काही दुर्घटना घडल्या असून यामुळे सणावाराचा आनंद हिसकावून घेतला गेला आहे. आई तुळजाभवानीची ज्योत आणण्यासाठी निघालेल्या दोघांवर काळाने घाला घातला असल्याची देखील घटना घडली आहे आणि सोलापूरजवळ विजेचा शॉक लागून पिता पुत्राचा अंत झाल्याची दु:खद घटनाही समोर आली आहे. 


घटस्थापना होण्याआधी संपूर्ण घर स्वच्छ केले जाते. घरातील संपूर्ण कपडे धुतली जातात त्यामुळे ग्रामीण भागातील घराघरातील महिला ओढ्यावर, नदीवर कपडे धुण्यात व्यस्त असतात आणि वाळत घातलेले कपडे दसरा सण जवळ आल्याचे सांगत असतात. शहरी भागात घरीच कपडे धुवून गच्चीवर वाळत घातले जातात. असे चित्र अलीकडे ग्रामीण भागातही दिसू लागले आहे आणि वाळत घातलेल्या याच कपड्यांनी एक कुटुंबाचा सणाचाच नव्हे तर आयुष्याचा आनंद हिरावून घेतला आहे. सोलापूरच्या जवळ असलेले परंतु उस्मानाबाद जिल्ह्यात, तुळजापूर तालुक्यात येत असलेल्या खडकी गावावर शोकाचे सावट पसरले आहे. दसऱ्यानिमित्त कपडे धुवून वाळत घातलेले असताना या कपड्यांच्या कारणाने मोठी दुर्घटना घडली आहे. 


खडकी येथील सचिन शामराव भंडारे यांच्या घरी दसऱ्याच्या निमित्ताने स्वच्छता सुरु होती, घरातील कपडे धुणे सुरु होते. असे धुतलेले कपडे घेवून भंडारे यांचा बारा वर्षे वयाचा मुलगा जय हा कपडे वाळत घालण्यासाठी घराच्या छतावर गेला. छतावर कपडे वाळत घालत असताना त्याला विजेचा जबर शॉक लागला. महावितरणची मुख्य सर्व्हिस वायर भंडारे यांच्या घरावरून गेलेली आहे, हातातील ओले कपडे हा लहान मुलगा भिंतीवर वाळत घालण्याचा प्रयत्न करीत असताना या कपड्यांचा स्पर्श या वायरला झाला. विद्युत प्रवाहित असलेल्या या वायरला ओले कपडे लागल्यामुळे जय भंडारे या बारा वर्षीय मुलाला जोराचा शॉक लागला. शॉक बसताच जय मोठ्याने ओरडला. मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून पस्तीस वर्षे वयाचे त्याचे वडील सचिन भंडारे हे धावत गच्चीवर गेले. विजेच्या धक्क्याने जय भाजला जात असल्याचे पाहताच आपली पर्वा न करता ते मदतीला धावले. मुलाला वाचविण्याच्या नादात वडिलांना देखील शॉक लागला. विजेच्या धक्क्याने दोघेही घराच्या वरून खाली कोसळले.


सचिन भंडारे आणि  त्यांचा मुलगा जय भंडारे या दोघानाही  तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले परंतु उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भंडारे कुटुंबावर ऐन सणासुदीच्या दिवसात दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे. (Simultaneous death of father and son due to electric shock)सचिन भंडारे यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते तर छोटा जय हा सहाव्या इयत्तेत शिकत होता. एका घटनेत पिता पुत्रांचा एकाच वेळी मृत्यू झाला त्यामुळे गावासह परिसरात देखील हळहळ व्यक्त होत आहे. 


     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !