BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ सप्टें, २०२२

पोलीस असल्याची बतावणी करून चौघांची फसवणूक !




शोध न्यूज : पोलिसात भरती करून देतो असे म्हणत एका भामट्या पोलिसाने चौघांची आर्थिक फसवणूक केली पण अखेर त्याचे बिंग फुटले आणि पोलिसांच्याच कोठडीत जाऊन बसावे लागले असल्याची घटना उघडकीस आली आहे. 


बेकारीचे प्रमाण वाढले आणि त्यापाठोपाठ बेकार युवकांना टोप्या घालणारांची एक जमात उदयास आली. विविध विभागात नोकरी लाऊन देतो, आपली ओळख वशिला आहे अशा भूलथापा देत आधीच अडचणीत असलेल्या बेकार तरुणांना आणखी अडचणीत आणण्याचे प्रकार बिनधास्त सुरु असतात. नोकरीच्या आशेने तरुण कुठूनही आणि काहीही करून रक्कम जमा करतो आणि अशा भामट्यांच्या हवाली करतो, पुन्हा नोकरी तर मिळत नाहीच पण पैसेही परत मिळत नाहीत. मंगळवेढा  तालुक्यातील एका भामट्या पोपटाने तर पोलीस असल्याचे भासवत दक्षिण सोलापूर तालुक्यातील चौघांना गंडा घातल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. आपण पोलीस असून तुम्हालाही पोलिसात भरती करतो अशी बतावणी करीत चार बेकार तरुणांची आर्थिक फसवणूक पोपट रामचंद्र चौगुले याने केली आहे. 


पोलीस खात्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या चार तरुणांना प्रत्येकी साठ हजार रुपयांचा गंडा घालत २ लाख ४० हजार रुपये लाटले असल्याची तक्रार वळसंग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोपट चौगुले हा १० मे २०२२ रोजी औज येथील एका शेतात आला होता आणि त्याने आपण पोलीस असल्याचे सांगितले होते. रवी गेनासिध्द जमादार, समर्थ अशोक भगत, आकाश चंद्रकांत कोळी यांना पोलीस असल्याची बतावणी करीत तुम्हालाही पोलिसात भरती करू शकतो असे सांगून तिघांकडून प्रयेकी साठ हजार रुपयांची मागणी केली. 


बेकार असलेल्या तरुणांना ही चांगली संधी चालून आली असे वाटून गेले आणि त्यांनी आपल्या मित्रांनाही रक्कम देण्यासाठी प्रवृत्त केले. बेकारीच्या काळात थेट पोलिसात भरती होता येतेय त्यामुळे साठ हजाराची रक्कम देण्यास हे तिघे तर तयार झालेच पण या तिघांसह मलकारसिद्ध रमेश जामदार यांनी देखील साठ हजार देण्याची तयारी दाखवली. सदररक्कम देण्याआधी पोपट चौगुले याने पोलिसांच्या वेषात या तरुणांना व्हिडीओ कॉल केला होता. त्यामुळे हा 'पोपट' पोलिसात असल्याचा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला होता. (Cheated by fake police as he recruits police) यामुळेच सदर चार तरुणांनी पोलिसातील नौकरीच्या आशेने प्रत्येकी ६० हजार असे २ लाख ४० हजार रुपये त्याच्या हवाली केले.


मे महिन्यात ही रक्कम पोपट चौगुले याच्या स्वाधीन करण्यात आली होती पण पोलीस भरतीबाबत पुढे काहीच झाले नाही. या तरुणांना पोलीस विभागात नोकरी मिळालीच नाही पण प्रत्येकी साठ हजार रुपयांची फसवणूक झाली होती. एकूण प्रकाराचा अंदाज तरुणांनी घेतला आणि या पोपटाने गोड बोलून आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस बनून आपल्याला गंडा घातला गेल्याची खात्री होताच मलकारसिद्ध जमादार याने वळसंग पोलिसात धाव घेतली. मे महिन्यात घडलेल्या फसवणूकप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी या भामट्या पोलिसाच्या मुसक्या आवळल्या.  गुन्हा दाखल होताच वळसंग पोलिसांनी पोपट चौगुले यास अटक केली आहे. बेकार तरुणांनी अशा घटनापासून धडा घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे.     
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !