BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ सप्टें, २०२२

सोलापूर जिल्ह्यात 'लम्पी' चा पहिला बळी !

 


शोध  न्यूज : लम्पी आजाराने पशुपालकांची चिंता वाढवलेली असतानाच सोलापूर जिल्यात एका बैलाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. 


लम्पी च्या प्रादुर्भावामुळे पशुपालक चिंतेत असून शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. राज्यात सर्वत्र या आजाराने जनावरे हैराण झाली असून जनावरांना मोठा धोका उत्पन्न झाला आहे. पशुधन वाचविण्याचे पशुपालकांच्या समोर एक मोठे आव्हान उभे असून शेतकरी धास्तावला आहे. बैल हा शेतकऱ्यांचा निष्ठावान साथीदार असून बैलाला कुटुंबातील एक घटक मानून शेतकरी त्याची निगा राखत असतो पण आता हा जनावरांचा 'कोरोना' सुरु झाल्यामुळे आपली जनावरे वाचविण्यासाठी शेतकरी धडपडू लागला आहे. त्यासोबत प्रशासन आणि पशु वैद्यकीय विभाग देखील कामाला लागला आहे. अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात लम्पीचा पहिला बळी गेला आहे.


राज्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातही या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक बैलाचा लंपीमुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक घटना समोर आली आहे. माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथील हिंदुराव तुकाराम वाघमोडे यांच्या एका बैलाचा मृत्यू झाला असून या आजाराने बैलाचा मृत्यू होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढली असून प्रशासनापुढे असलेले आव्हान देखील आता वाढताना दिसू लागले आहे.  गेल्या काही दिवसांपासून या आजाराचा प्रादुर्भाव सोलापूर जिल्ह्यात दिसून येत होता परंतु अशी घटना मात्र घडलेली नव्हती. 


सोलापूर जिल्ह्यात २४ गावात या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला असून ४८ बाधित जनावरांवर उपचार सुरु असताना माळशिरस येथील ही चिंता वाढविणारी घटना समोर आली आहे.  सोलापूर जिल्ह्यात आजवर ७३ जनावरे लम्पी बाधित झाली होती. यात ७२ गाय, बैलांचा समावेश असून एका म्हशीलाही हा प्रादुर्भाव झाला होता. यातील २३ गाई, एक म्हैस अशी २४ जनावरे आजारातून बरी झाली आहेत. सद्या जिल्ह्यात ४८ जनावरे लम्पी बाधित असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. (Bull died due to 'lumpy' in Solapur district) परिस्थितीचे गांभीर्य पाहून प्रशासन वेगाने हालचाली करीत आहे, तरीही सोलापूर जिल्ह्यातील मृत्यूची पहिली घटना समोर आली आहे त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे.


'लम्पी' चा प्रादुर्भाव वाढू लागताच लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून ४२ हजार ८९१ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीचे १ लाख ८८ हजार ६०९ डोस उपलब्ध असून लसीकरण सुरु आहे.  सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत सर्वाधिक प्रदुभाव माळशिरस तालुक्यात आढळून आला असून येथे ४९ जनावरे बाधित झाली आहेत आणि पहिला मृत्यू देखील याच तालुक्यातून समोर आला आहे. सांगोला तालुक्यात ११ जनावरे बाधित आहेत तर माढा तालुक्यात ५, उत्तर सोलापूर तालुका - ४, पंढरपूर तालुका - २, मंगळवेढा - १ आणि बार्शी तालुक्यात १ अशी बाधित जनावरे आहेत. या आजाराचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून शेतकरी चिंतेत असताना आता माळशिरस तालुक्यातील घटना घडल्यामुळे या चिंतेत वाढ झाल्याचे दिसत आहे . 


   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !