BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ सप्टें, २०२२

शाळेच्या लिपिकासह मुख्याध्यापकावर लाचखोरीचा गुन्हा !

 



शोध न्यूज : महिला शिक्षिकेच्या पतीकडून लाच घेताना मुख्याध्यापक आणि लिपिकाला लाचलुचपत पथकाने सापळा लाऊन पकडण्यात आल्याने शिक्षण विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.


पोलीस, महसूल आणि शासनाचे अन्य काही विभागातील लाचखोर पकडले जात असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत परंतु पवित्र समजले जाणारे शिक्षण खाते देखील अधूनमधून अपवित्रतेच्या जाळ्यात अडकताना दिसतात. शिक्षकांना गलेलठ्ठ पगार असतात आणि त्यांचा संबंध लाचेशी येण्याची शक्यता कमीच असते. परतू त्यांच्यावर लाच देण्याची वेळ मात्र येते आणि ही लाच घेणारा त्यांचाच मुख्याध्यापक आणि लिपिक असतो हे पुन्हा एकदा समोर आले आहे. मुख्याध्यापक आणि लिपिक यांनी आपल्याच शाळेतील महिला शिक्षिकेला देखील सोडले नाही पण शिक्षिकेने लाचखोराना चांगलीच अद्दल घडवली आहे. शिक्षण क्षेत्रातील या लाचखोरीमुळे लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. 


सदानंद प्राथमिक शाळेतील महिला शिक्षिकेला सहा आठवड्याची रजा हवी होती त्यामुळे त्यांनी अर्जित रजेचा अर्ज मुख्याध्यापक यांच्याकडे सादर केला होता. रजा मंजूर करणे ही सामान्य प्रक्रिया असली तरी शिक्षिकेची गरज पाहून त्यांना सात हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. शिक्षिकेच्या पतीला शाळेत बोलावून घेण्यात आले आणि अर्जित रजा मंजूर करण्यासाठी ७ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. आठवड्याच्या अर्जित रजेसाठी सात हजाराची मागणी केल्याने शिक्षिकेचे पती आश्चर्यचकित झाले आणि त्यांना धक्काही बसला. अखेर तडजोड होऊन सहा हजार रुपये लाच ठरली गेली. हक्काची रजा घेण्यासाठीही लाच द्यावी लागत असल्यामुळे शिक्षिकेच्या पतीला अशी लाच देणे मान्य नव्हते. 


सदर शिक्षिकेच्या पतींनी थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत लाचेची मागणी केल्याचे समोर आले त्यामुळे रंगेहात पकडण्यासाठी सापळा लावला गेला. लिपिक  लिपीक शशिकांत विठ्ठलराव खरोसेकर याने मुख्याध्यापक सुधाकर पोतदार यांच्यासमोर सहा हजार रुपयांची लाच स्वीकारली. सदर लाचेची रक्कम घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडप घालून पकडले. सदानंद प्राथमिक शाळेचा लिपिक शशिकांत विठ्ठलराव खरोसेकर आणि मुख्याध्यापक सुधाकर जगन्नाथ पोतदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


लाचखोरीच्या घटना सतत घडत असल्या तरी शिक्षण क्षेत्रात आणि रजा मंजुरीसाठी लाच मागितली, मुख्याध्यापकाच्या समोर आणि त्यांच्याच कार्यालयात ती स्वीकारण्यात आली यामुळे शिक्षण क्षेत्र तसेच शिक्षकी पेशा कलंकित करण्याचा प्रकार झाला. (School Headmaster, clerk caught red handed for bribery)या घटनेमुळे जिल्हाभर चर्चा सुरु झाली आहेच पण शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !