BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ सप्टें, २०२२

बासुंदीत झुरळ टाकून वसूल केली लाखाची खंडणी !

 


शोध न्यूज : पैशासाठी हल्लीच्या युगात कोण काय करील हे सांगता येत नाही, एका भामट्याने चक्क बासुंदीत झुरळ टाकून दुकानदाराकडून लाख रुपये वसूल केल्याची घटना उघडकीस आली आहे.


समाजात अनेक भामटे इतरांना फसवून, टोप्या घालून पैसे मिळवत असतात. रोज नव्या युक्त्या हे शोधत असतात आणि सामान्य माणूस यांच्या नवनव्या युक्त्यांना फसत असतो. पैसा मिळविण्यासाठी कुणी काहीही उद्योग करतो. नाशिकमध्ये तर एका लबाड भामट्याने बासुंदीत स्वत:च झुरळ टाकून एक लाख रुपये वसूल केले. एका झुरळाचे लाख रुपये त्याला मिळाले पण तेवढ्यातही त्याचे समाधान होत नव्हते. त्याचे केलेला प्रकार खपून गेला असे त्याला वाटले पण त्याचे भांडे फुटले आणि पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. बासुंदीत झुरळ पडल्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत या भामट्याने दोन मिठाई दुकानांच्या चालकाकडे खंडणी मागितली. 


सागर स्वीटसचे चालक दीपक चौधरी आणि रतन चौधरी यांच्याकडून अजय राठोड या बहाद्दराने एक लाख वसूल केले. पठ्ठ्याने मिठाई दुकानात येवून बासुंदी घेतली आणि कुणाच्याही नकळत त्याने या बासुंदीत झुरळ टाकले. बासुंदीत झुरळ असल्याचे त्याने दुकान मालकाला दाखवले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याची धमकीही तो देवू लागला. अशा वेळी कुठलाही दुकानदार घाबरून जाणे स्वाभाविक असते. हा प्रकार ग्राहकात गेला तर ग्राहक यायचे बंद होतील आणि प्रशासनाकडे तक्रार गेली तर कारवाई होण्याची भीती असते. त्याचाच फायदा उठवत या राठोडने दुकानदारांकडे एक लाख रुपयांची मागणी केली.  त्यानंतर पुन्हा एकदा धमकावत त्याने एक लाख रुपयाची खंडणी रोख स्वरुपात घेतली.


दुसरा प्रकार गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. याच राठोड याने तेथेही मधुर स्वीट्स या दुकानात देखील बासुंदी घेतली आणि झुरळ टाकून खंडणी मागण्याचा प्रकार केला.  दुकानाचे मालक मनीष चौधरी यांच्याकडे त्याने तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केली. मालकांनी नकार दिल्यावर त्याने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्याची धमकी देणे सुरु केले. याचा व्हिडीओ व्हायरल करून तुमची आणि तुमच्या दुकानाची बदनामी करीन अशी धमकीही त्याने दिली. (Blackmail the shopkeeper by throwing cockroaches in Basundi) या भामट्याने दोन्ही ठिकाणी एकसारखाच फंडा अवलंबला आणि दुकानदाराकडून मोठी रक्कम वसूल करण्याचा प्रयत्न केला. एक प्रकार यशस्वी झाल्याने त्याने दुसऱ्याही एका दुकानातून अशाच प्रकारे पैसे वसूल करण्याचा डाव केला. 


दोन लाखात प्रकरण मिटवून टाका, आपण कुठे तक्रार करणार नाही असे त्याने पुन्हा पुन्हा दुकान मालकास फोन करून सांगितले. पैसे मिळत  नाहीत असे दिसल्यानंतर त्याने फोन करून, मेसेज पाठवून आणि व्हिडीओ देखील पाठवून दुकान बंद पाडण्याची धमकी देत पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली. बासुंदीची काळजी घेवूनही बासुंदीत झुरळ कसे पडले हे दुकान मालकांच्या लक्षात येत नव्हते. त्यांनी सगळी चौकशी केली परंतु हा प्रकार काय आणि कसा झाला याचे कोडे सुटत नव्हते. 


अखेर त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे ठरवले. जेंव्हा त्यांनी हे फुटेज पहिले तेंव्हा त्यांना धक्काच बसला. तक्रार करणारा हा भामटा स्वत:च बासुंदीमध्ये झुरळ टाकताना फुटेजमध्ये दिसत होता. दुकान मालकांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल केला. या घटनेची चर्चाही सुरु झाली असून दुकानदारांनी अशा लबाड ग्राहकांपासून सावध राहण्याची आवश्यकता या घटनेने अधोरेखित केली आहे.


  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !