BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ सप्टें, २०२२

अभिनेता सलमान खानची हत्या करण्याचा दुसऱ्यांदा कट !


शोध न्यूज : अभिनेता सलमान खान याची हत्या करण्याचा दुसऱ्यांदा कट रचला गेल्याची अत्यंत धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. सलमान खान याला आधीच धमकीही देण्यात आली होती.

 
अभिनेता सलमान खान याच्या जीवाला मागील काही काळापासून मोठा धोका असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीकडून काही महिन्यांपूर्वीच सलमान खान याला मारण्याबाबत मोठी धमकी मिळाली होती. सलमान खान याचे वडील सलीम खान यांना तशा प्रकारची धमकी असल्याची एक चिट्ठी मिळाली होती. परंतु हा डाव फसला गेला. पंजाबी गायक सिद्धू मुसावाला यास मारण्याच्या आधीच लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याला मारण्याची दुसऱ्यांदा योजना आखली, पहिला प्लॅन फसल्यानंतर या टोळीने प्लॅन बी तयार केला असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.

 
सलमान खान याची हत्या करण्यासाठी दुसऱ्यांदा कट रचण्यात आला आणि सलमान खान याच्या पनवेल येथील फार्महाऊसमध्येच त्याचा काटा काढण्याची योजना आखली गेली होती हे आता तपासात पुढे आले आहे. गोल्डी बार हा या थरारक कटाचे नेतृत्व करीत होता आणि त्याने सलमान खान याला मारून टाकण्यासाठी लॉरेन्स बिष्णोई टोळीचा शुटर कपिल पंडित याची निवड केली होती. या कपिल पंडित याला भारत- नेपालच्या सीमेवरून पोलिसांनी अलीकडेच अटक केलेली आहे. पनवेल फार्म हाऊस येथेच सलमान खान याला मारून टाकण्याचा नियोजनबद्ध कट रचण्यात आला होता. पनवेलमध्येच भाड्याने खोली घेवून काही हल्लेखोर तेथेच रहात होते. यात कपिल पंडित याच्यासह दीपक मुंडी, संतोष जाधव आणि अन्य काही शुटर्सचा समावेश होता.

 
पनवेल येथील सलमान खान याच्या फार्म हाउस आणि रस्त्याची पूर्ण रेकी करण्यात आली होती. लॉरेन्स टोळीचे काही लोक दीड महिन्यापासून भाडोत्री खोलीत पनवेल येथेच तळ ठोकून होते. सलमान खान याची अत्यंत बारीक माहिती यांनी काढली होती. सलमान खान याच्याकडून मुंबईत एक मोठा अपघात झाल्याचा गुन्हा त्याच्यावर आहे. या घटनेपासून तसेच रस्त्यावर खूप खड्डे आहेत त्यामुळे सलमान खान याच्या गाडीचा वेग अत्यंत कमी असतो हे या टोळीला माहित होते. (Second Conspiracy to Kill Actor Salman Khan) सलमान खान जेंव्हा पनवेल येथील त्याच्या फार्म हाउसवर येथे तेंव्हा त्याच्यासोबत इतर कुणीही नसते. केवळ त्याचा बॉडीगार्ड शेरा हा एकटाच सलमान खान याच्या सोबत असतो याची देखील या टोळीने पुरती माहिती घेतलेली होती. 


शिकारीचा बदला ! 

    
सलमान खान याच्यावर काळवीट शिकारीचा मोठा आरोप आला होता. लॉरेन्स बिष्णोई याला १९९८ च्या काळवीट शिकारीचा बदला घेण्यासाठी सलमान खान याची हत्या करायची आहे. लॉरेन्स याने याबाबत स्वत: माहिती दिलेली होती. पोलीस रिमांडमध्ये असताना बिष्णोई याने सलमान खान याच्या हत्येसाठी २०१८ साली आखलेल्या कटाची माहिती दिली होती. सालमन खान याची हत्या करण्यासाठी चार लाख खर्च करून एक खास रायफल खरेदी केली होती आणि या कटाची सगळी तयारी देखील केल्याचे बिष्णोई याने स्वत:च सांगितले होते.


गार्ड सोबत मैत्री !

सलमान खान याची हत्या करण्यासाठी आलेल्या आणि पनवेल येथे राहिलेल्या शूटर्सने सलमान खान याच्या फार्म हाउसवरील गार्ड सोबत मैत्रीही केली होती. आपण सलमानचे चाहते असल्याचे भासवत ही मैत्री करण्यात आली होती. यामुळे गार्डकडून सलमानच्या संदर्भात सगळी माहिती मिळू शकेल असे त्यांचे नियोजन होते. हल्लेखोर दबा धरून बसलेले असताना सलमान खान दोन वेळा या फार्म हाउसवर येवून गेला होता.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !