शोध न्यूज : एका तरुणाच्या पोटातून स्टीलचे तब्बल ६३ चमचे बाहेर काढण्यात डॉक्टरना यश आले असून हे चमचे त्याच्या पोटात कसे गेले याचे कोडे मात्र उलगडले नाही.
पोटातलं कधी न कधी ओठावर येते म्हणतात पण या पोटात नक्की काय काय दडलेलं असतं हेच एक कोडं बनून राहिलं आहे. लहान मुले खेळता खेळता अनेक वस्तू गिळतात आणि त्या कधी त्यांच्या घशात अडकून राहतात तर कधी पोटात जाऊन गोंधळ घालतात. सतत केस खाण्याची सवय असलेल्या मुली, महिलांच्या पोटातून काही किलो वजनाचे केसांचे गोळे डॉक्टरांनी आत्ता पर्यंत काढलेले आहेत. मोठ्या माणसांच्याही पोटात काही काही धक्कादायक असे दडलेले असते आणि त्रास व्हायला लागला की डॉक्टर ते बाहेर काढतात. शस्त्रक्रिया करतांना चुकून पोटात कात्री, हातमोजे, कापसाचे बोळे राहून जातात आणि मग त्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करून ते काढले जातात. अशी अनेक उदाहरणे आपल्या माहितीत असतात पण एका तरुणाच्या पोटात चक्क स्टीलचे चमचे आढळून आले आहेत. विशेष म्हणजे एकदा दुसरा चमचा नव्हे तर डॉक्टरांनी तब्बल ६३ चमचे याच्या पोटातून बाहेर काढले आहेत.
पोटात दुखायला लागले की माणूस डॉक्टरांकडे धावत सुटतो. पोटदुखीची अनेक कारणे असतात पण कधी कधी विचित्र कारणेही समोर येतात. पोटात गेलेले काही दडून रहात नाही, कुठलीही बाहेरची वस्तू पोटात अडकली की त्याच्या वेदना होतच असतात. मुजफ्फरपूर नगर जिल्ह्यातील बोपडा गावात राहणाऱ्या विजयच्या पोटात अचानक दुखू लागले म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती एकदम बिघडली होती. अत्यवस्थ प्रकृती असल्यामुळे त्याला मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्या पण त्याच्या पोटात दुखण्याचे नेमके कारण समजून येत नव्हते.
रुग्णाची प्रकृती पाहून डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि जेंव्हा शस्त्रक्रिया सुरु झाली तेंव्हा डॉक्टरांचीही बोलती बंद झाली. त्याच्या पोटात चक्क स्टीलच्या धातूचे चमचे आढळून आले. एखादा दुसरा नव्हे तर तब्बल ६३ चमचे त्याच्या पोटातून बाहेर काढले गेले. हे चमचे स्टीलचे होते परंतु त्याचा पुढचा भाग मात्र गायब होता. हे चमचे त्याच्या पोटात कसे गेले? हा प्रश्न डॉक्टरना आणि त्याच्या नातेवाईकांनाही पडला आहे. विजयला अमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन होते त्यामुळे त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथेच कुणीतरी त्याला हे चमचे खाऊ घातले असावेत असा संशय आहे.
शस्त्रक्रिया यशस्वी होऊन सर्व चमचे बाहेर काढण्यात आले आहेत परंतु तरीही विजयची प्रकृती अद्याप ठीक नाही. अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच समोर आली असल्याचे डॉक्टरांनीही सांगितले आहे. कुणी अशा प्रकारे एवढे चमचे कशासाठी गिळेल हे एक कोडेच आहे असे डॉक्टरांनी म्हटले आहे. (A steel spoon was found in the young man's stomach) व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचाऱ्यांनी बळजबरीने विजयला हे चमचे खाऊ घातले असावेत असा आरोप विजयचे नातेवाईक करीत आहेत. विजयला ड्रगचे व्यसन होते आणि तो त्याच्या अमलाखाली असताना असे काही घडले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !