BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२८ सप्टें, २०२२

अवैध गुटक्यासह सतरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत !





शोध न्यूज : कर्नाटक राज्यातून मंगळवेढ्याकडे येत असलेला लाखो रुपयांचा गुटखा मंगळवेढा पोलिसांनी जप्त केला असून एकूण साडे सतरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.


शेजारच्या राज्यातून महाराष्ट्रात येणारा गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला असे विविध आणि बंदी असलेले पदार्थ पकडण्याच्या मोठ्या कारवाया गेल्या काही काळात होत असून यात मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर पोलिसांनी सतत यश मिळवले आहे. सांगोला येथे नुकतीच अशी एक कारवाई झालेली असताना आता पुन्हा मंगळवेढा पोलिसांनी मनाई असलेला पान मसाला, तंबाखू वाहतूक पकडली आहे. मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मौजे चडचण (कर्नाटक राज्य) येथून  काही लोक महिंन्द्रा पीकअप गाडी नंबर के.ए. २८ सी. ७६८८ मधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा अवैधरित्या घेवून येणार असल्याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाली होती.


सदर गोपनीय माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावाच्या दिशेने एका खाजगी वाहनातून गेले आणि रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास गावाच्या अलीकडील बाजूस असलेल्या हॉटेल सह्याद्रीसमोर जाताच समोरून एक पिकअप वाहन येताना दिसून आले. सदर वाहन पोलिसांनी थांबवले आणि विचारपूस सुरु केली. सदर वाहनाचा क्रमांक मिळालेल्या माहितीशी जुळत होता. या वाहनात एकूण तीन व्यक्ती आढळून आल्या. याकुब हसनसाब बबलेश्वर (वय ५२ वर्षे रा. जामा मशीदी जवळ विजापूर ता. विजापूर राज्य कर्नाटक,  आप्पासाहेब सोनू चव्हाण (वय ३४ वर्षे रा. मदमई ता. विजापूर जि. विजापूर राज्य कर्नाटक), आणि श्रीकांत रामसिंग राठोड (वय २३ वर्षे रा. अल्लीबादी ता. विजापूर जि. विजापूर राज्य कर्नाटक)  अशी त्यांनी आपली नावे सांगितली. 


पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी सुरु केली तेंव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. गाडीच्या हौद्यात काय आहे अशी पोलिसांनी चौकशी केली परंतु त्यांनी नेमके उत्तर देण्यास टाळाटाळ केली आणि ते काहीतरी लपवतात असे लक्षात आले. पोलिसांनी विश्वासात घेवून त्यांची चौकशी केल्यानंतर मात्र या तिघांनी गाडीत गुटखा असल्याचे कबूल केले. पोलिसांनी  दोन पंचाच्या समक्ष गाडीतील माल पडताळून पहिला. यावेळी  हिरा पान मसाला असलेल्या ६० पिशव्या, (किंम्मत रु. ७ लाख ५६ हजार)  रॉयल ७१७ तंबाखूच्या ३० पिशव्या (किंमत रु. १ लाख ८९ हजार) असा माल आढळून आला. पोलिसांनी सदर गुटखा आणि ८ लाख रुपये किमतीचे महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन असा १७ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला. 


सदर तीन व्यक्तिंसह वाहन मंगळवेढा  पोलीस ठाण्यात आणून अन्न व औषध प्रशासनास याची माहिती देण्यात आली. त्यानुसार या विभागाचे एक पथक मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल झाले. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांनी याबाबत फिर्याद दिल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याकुब हसनसाब बबलेश्वर, आप्पासाहेब सोनू चव्हाण, श्रीकांत रामसिंग राठोड, वाहन मालक खैरू सोनू चव्हाण आणि विजापूर येथील पुरवठादार मोहम्मद अली जिलानी अत्तारया पाच जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल काण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, २७२, २७३ व ३२८ सह अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६(२)(i) व २६(2)(ii), २६ (२) (iv), सहवाचन कलम २(३), कलम ३(२) शिक्षापात्र कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचा तपास हवालदार महेश कोळी करीत आहेत.


सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षक  तेजस्वी सातपुते , अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील मॅडम मंगळवेढा विभाग मंगळवेढा, (Mangalvedha police caught illegal gutkha)यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी व त्याचे पथकातील हवालदार कोळी, पोलीस कर्मचारी कोळी यांनी ही कारवाई केली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !