BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ सप्टें, २०२२

जीव वाचवायला आला आणि जीव देवून बसला !

 


शोध न्यूज : जीव वाचविण्यासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आलेल्या एका रुग्णाने रुग्णालयातच गळफास घेवून जीव दिल्याने चर्चा आणि तर्कवितर्काला जोर आला आला असून नातेवाईकांनी मात्र रुग्णालयाला जबाबदार धरले आहे.


डॉक्टर हा परमेश्वर आणि रुग्णालय हे मंदिर मानले जाते आणि याच विश्वासाने प्रत्येक रुग्ण रुग्णालयात जाऊन उपचार घेत असतो. मरणाच्या दारात उभे असलेल्या रुग्णांना येथे जीवदान मिळत असते. जीव वाचविण्यासाठी रुग्णालयात प्रत्येक रुग्ण जातो पण एक रुग्ण जीव वाचविण्यासाठी रुग्णालयात आला आणि याच रुग्णालयात जीव देवून बसला. अमरावती येथील ही घटना अनेकांना बुचकळ्यात टाकणारी ठरली आहे. जीव नकोसा झालेले, प्रचंड नैराश्य आलेल्या व्यक्ती आत्महत्येसारखे टोकाचे आणि चुकीचे पाऊल उचलतात पण जीव वाचवा म्हणून रुग्णालयात आलेला रुग्ण रुग्णालयातच गळफास घेवून आपले जीवन संपवतो ही वेगळी घटना आहे. त्यामुळेच या घटनेबाबत उलटसुलट चर्चा आणि तर्क वितर्क सुरु झाले आहेत.   


सुरेश बारकाजी माकोडे हा रुग्ण मध्यरात्रीच्या नंतर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाला. त्याला प्रचंड वेदना होत होत्या आणि त्याची प्रकृती अधिकच बिघडली होती त्यामुळे त्याला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात जीव वाचेल म्हणून हा रुग्ण आला पण त्याने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे रुग्णालय प्रशासनाला आढळून आले. माकोडे याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर रुग्णालयाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. जीव वाचविण्यासाठी आलेल्या रुग्णाने रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहून रुग्णालय प्रशासन देखील हादरून गेले.


सदर रुग्णाने आत्महत्या का केली याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही त्यामुळे या घटनेतील गूढ आणखीच वाढले आहे. या रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर नातेवाईक निघून गेले होते. आपल्या रुग्णाला आराम वाटेल अशी अपेक्षा ठेवून असलेल्या नातेवाईकांना त्याच्या आत्महत्येच्या घटनेने मोठा धक्का बसला आहे. त्यांनी या घटनेला रुग्णालयाला जबाबदार धरले असून रुग्णालयावर आरोप करण्यात आले आहेत. (Patient commits suicide in hospital, relatives aligeshan to hospital) पोलिसांनी सदर घटनेचा तपास सुरु केला आहे परंतु या दुर्मिळ घटनेबाबत मात्र बरीच चर्चा सुरु झाली आहे. 


चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी गावातील ५५ वर्षे वयाचे सुरेश माकोडे यांना किडनीचा विकार होता. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखवण्यात आले होते परंतु मुत्राशायातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवले आणि तेथून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या वेदना कमी केल्या होत्या. दुसऱ्या दिवशीच सकाळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. परंतु त्यापूर्वीच त्यांनी बेडवरील चादर ग्रीलला बांधून आत्महत्या केल्याचे दिसून आले.  


रुग्णालय जबाबदार !

आत्महत्या केलेल्या सुरेश माकोडे यांच्या कुटुंबियांनी या घटनेला रुग्णालय जबाबदार असल्याचे म्हटले आहे. रुग्णावर रात्री योग्य उपचार करण्यात आले नाहीत, अतिदक्षता विभागात असलेला रुग्ण जनरल वार्डमध्ये पाठवला आणि त्याला होणाऱ्या वेदनांकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केले. या नैराश्यातून सुरेश माकोडे यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकानी केले आहेत. 


सकाळी मिळाली माहिती !

सदर रुग्णांने गळफास घेवून आत्महत्या केल्याची माहिती सकाळी नातेवाईकांना मिळाली आणि त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. घटनेबाबत रुगणालय प्रशासनाचे म्हणणेही आता समोर आले असून पोलीस तपास करीत आहेत. रुग्णाने आत्महत्या करण्यापूर्वी चिठठी लिहून ठेवली आहे काय ? या आत्महत्येचे नेमके कारण काय ?  अशा सर्व बाबींचा तपास पोलीस करणार आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !