BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ सप्टें, २०२२

चिमुटभर तंबाखुसाठी केला ठेचून खून !


शोध न्यूज : केवळ चिमुटभर तंबाखू दिली नाही म्हणून पंचावन्न वर्षाच्या व्यक्तीचा ठेचून खून केल्याची अत्यंत अमानुष घटना घडली असून पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.


अलीकडे माणसांचा जीव अत्यंत स्वस्त झाला असून कुठल्याही किरकोळ करणातून माणूसच माणसांचा जीव घेतो आहे. क्षणाचा राग एका कुटुंबावर पोरकेपणा आणत आहे तर आपलेही आयुष्य तुरुंगात खितपत पडणार आहे आणि कुटुंब उघड्यावर पडणार आहे याची जाणीव असतानाही असे गुन्हे केले जातात. तंबाखू ही आरोग्याला घातक असल्याचे इशारे वारंवार दिले जात असले तरी तंबाखू चघळऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. कुणीही कुणालाही तंबाखू मागत असते आणि मोठ्या प्रेमाने तंबाखू चुन्याची देवाणघेवाण होत असते. ग्रामीण भागात तर एकमेकांना बोलावून तंबाखू दिली घेतली जाते आणि तंबाखू मळत इकडच्या तिकडच्या गप्पा रंगत असतात. कोल्हापूरमध्ये मात्र वेगळाच प्रकार घडला आणि केवळ तंबाखू देण्यास नकार दिल्याच्या रागातून एक जीव घेतला गेला. 


शाहुवाडी तालुक्यातील शंकर आकाराम कांबळे हे ५५ वर्षे वयाचे गृहस्थ कोल्हापुरात असलेल्या आपल्या मुलीकडे आले होते. कोटीतीर्थ परिसरात ते फिरायला गेले होते. यावेळी अनोळखी असलेल्या शुभम शेंडगे आणि रोहित सुर्यगंध या दोघांनी कांबळे यांच्याकडे तंबाखूची मागणी केली. कांबळे यांनी त्यांना आपल्याजवळ तंबाखू नसल्याचे सांगितले. तंबाखू नाही म्हटल्याबरोबर या दोघांना संशय आला आणि त्यांनी कांबळे यांना पकडले. त्यांची झडती घ्यायला सुरुवात केली. कांबळे यांचे खिसे तपासले असता खिशात तंबाखू आढळून आली. खिशात तंबाखू असूनही नाही म्हणून सांगितल्याचा राग शुभम आणि रोहित यांना आला आणि त्यांनी सरळ त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. 


कांबळे यांना बेदम मारहाण करताना शेजारीच पडलेले दगड उचलले, लाकडी बांबूही घेतला आणि कांबळे यांना ठेचून ठेचून मारले. दगडाने ठेचल्याने कांबळे हे रक्तबंबाळ झाले पण त्यांना दया आली नाही. चिमुटभर तंबाखूसाठी कांबळे यांचे रक्त सांडले जात होते. त्यांना अनेक जखमा झाल्या होत्या आणि त्या जखमातून रक्तस्त्राव होत होता. अशा परिस्थितीत देखील हल्लेखोरांना दया आली नाही आणि त्यांनी मारणे सुरूच ठेवले होते. बेदम मारहाण केल्यानंतर कांबळे यांना रक्तबंबाळ अवस्थेत तेथेच टाकून ते पसार झाले. अधिकच रक्तस्त्राव झाल्याने कांबळे यांचा तेथेच मृत्यू झाला. 


केवळ तंबाखू नाही म्हटले  म्हणून गंभीर घटना घडली होती, रक्ताच्या थारोळ्यात कांबळे त्याच जागी पडून होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली तेंव्हा पोलीस धावत घटनास्थळी गेले. रक्तबंबाळ अवस्थेतील कांबळे यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले परंतु हा खून कुणी केला याचे काहीच  धागेदोरे पोलिसांच्या हाती नव्हते. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. या परिसरातून शुभम आणि रोहित फिरताना या फुटेजमध्ये निदर्शनास आले. त्यावरून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. यादवनगर येथे राहणारा शुभम अशोक शेंडगे या २८ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर त्याच नगरात राहणाऱ्या रोहित अजय सूर्यगंध या २७ वर्षाचा तरुणाचा पोलीस शोध  घेत आहेत. 


सदर खुनाच्या घटनेने कोल्हापूर परिसरात एकच खळबळ उडाली असून तंबाखू दिली नाही हे काय खुनाचे कारण  असू शकते काय ? असा प्रश्न पडला आहे. अत्यंत किरकोळ गोष्टीसाठी एखाद्याचा जीव घेतला जातो या कल्पनेनेच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. (Inhumane murder, killed because tobacco was not given) माणसांचा जीव चिमुटभर तंबाखूच्या किमतीचा बनला असल्याचे या घटनेने दाखवून दिले आहे. किती किरकोळ कारणासाठी माणूस माणसांच्या जीवावर उठू शकतो हेच या घटनेने अधोरेखित केले आहे.     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !