BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ ऑग, २०२२

अस्थी विसर्जनासाठी गेलेला तरुण गेला नदीत वाहून !



शोध न्यूज : अस्थी विसर्जनासाठी गेलेला तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 


परवाच पंढरपूर येथे चंद्रभागा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेला आणि त्याला वाचवताही आले नाही, एका वृध्द महिलेने नदीच्या पुरात उडी घेतली परंतु सुदैवाने या महिलेला वाचविण्यात यश आले. त्यानंतर सीना नदीच्या पात्रात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सोलापूर येथील हनुमान नगर येथे राहणारे २७ वर्षे वयाचे किशोर डिगाजी व्हटकर यांच्या काकांचे निधन झाले आहे. आपल्या काकांच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथील सीना नदीच्या बंधाऱ्यावर ते गेले होते. त्यांच्यासोबत कुटुंबीय आणि नातेवाईक देखील होते.  यावेळी अस्थीवचे विसर्जन करताना किशोर व्हटकर या तरुणाचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे नातेवाईक घाबरून गेले. 


नदीच्या पाण्यात पडलेल्या किशोरच्या मदतीसाठी नातेवाईक पुढे धावले, त्याच्या आधारासाठी दोघांनी हात दिला पण त्याचाही उपयोग झाला नाही हात निसटल्यामुले ते पाण्याच्या प्रवाहासोबत जाऊ लागला. दुर्दैवाची बाब अशी की पाण्याच्या प्रवाहात पडलेल्या किशोरला पोहता येत नव्हते त्यामुळे तो पाण्याबरोबर वहात जाऊ लागला. काठावर नातेवाईक असून देखील त्यांना काही करता आले नाही. नातेवाईकांनी प्रचंड आरडाओरडा केला पण त्याने काहीच होणार नव्हते. सत्तावीस वर्षांचा तरुण नातेवाईकांच्या डोळ्यादेखत नदीच्या पाण्यात वाहून गेला. वाळूच्या उपशामुळे नदीत जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे किशोर काही क्षणात दिसेनासा झाला आणि तो पाण्यात बुडाला. 


या घटनेने सीना नदीच्या काठावर एकच गोंधळ उडाला होता. परिसरातील नागरिकांनी देखील येथे गर्दी केली. किशोरला वाचविण्यासाठी चिचोली औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशामक दल तातडीने मदतीसाठी धावले. या दलाचे कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक गावकरी यांनी किशोरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. जवळपास तीन तास शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु किशोर सापडू शकला नाही. अखेर शोध मोहीम देखील थांबली आणि किशोर डोळ्यादेखत सीना नदीच्या पात्रात अदृश्य झाला. आपल्या काकांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी नदीवर आलेल्या किशोरला सीना नदीने गिळंकृत केले. (The young man drowned in the Sina river) या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस देखील येथे पोहोचले. आधीच दु:खात असलेल्या नातेवाईकांवर हा दुसरा आघात झाला होता.  


किशोरचा बळी हा अवैध वाहतुकीने घेतला असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकातून व्यक्त होऊ लागल्या आहेत. वाळू उपसा करण्यासाठी नदीत ठिकठिकाणी मोठे खड्डे झाले आहेत आणि हेच खड्डे निष्पाप नागरिकांचा जीव घेत आहेत. नदीच्या पात्रात खुलेआम वाळू उपसा केला जातो परंतु प्रशासन याकडे कानाडोळा करते, त्यामुळेच अशा घटना घडत असल्याचा संताप स्थानिक नागरिक करू लागले आहेत.   


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !