BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ ऑग, २०२२

भाकरी मागत पळवले सोन्याचे दागिने !

 



शोध न्यूज : सोलापुरात चोरीचा नवाच फंडा वापरून चार महिलांनी दिवसाढवळ्या एका घरात शिरून लुट केली आहे. या घटनेने नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. 


पुरुषांच्या तुलनेत महिला कुठेच कमी पडत नाही हे अनेकदा दिसून येते पण आता चोरीच्या गुन्ह्यात देखील महिलांचा सहभाग असल्याचे दिसू लागले आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी एक महिला चोरांची टोळी पकडली होती पण या महिला रस्त्यावर उभे राहून प्रवासासाठी रिक्षा अथवा अन्य प्रवासी खाजगी वाहनांना हात करून वाहन थांबवायच्या. वाहनात बसून इतर प्रवाशांच्या साहित्याची चोरी करून पुढच्या थांब्यावर उतरून आरामशीर निघून जायच्या. त्यांनी कधी चोरी केली हे लक्षात देखील येत नव्हते. जेंव्हा ही चोरी लक्षात येते तेंव्हा या चोरट्या महिला परागंदा झालेल्या असतात. सोलापुरात अलीकडेच एका वृद्ध जोडप्यास रिक्षातून अशा प्रकारे लुटण्यात आले होते. अशा घटना घडतात म्हणून अनेक जण सावध असतात पण आता तर चोरट्या महिलांनी नवाच फंडा शोधून काढला असल्याचे समोर आले आहे. 


भाजी भाकरी आणि पाणी मागत महिला घरात शिरल्या आणि घरातील रोकड, दागिने घेवून त्यांनी पोबारा केला, अशी ही घटना सोलापूर शहरात अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमधील नीलम नगर येथे घडली असून या घटनेने परिसरात चर्चा सुरु झाली आहे. मोहन येलगटी यांच्या घरात चार अनोळखी महिला आल्या. भिकारी असल्याचा आभास करीत असलेल्या या महिलांनी येलगटी यांची बहिण वैष्णवी यांना 'आपल्याला भूक लागली असून भाजी भाकरी द्या, पाणी द्या' अशी मागणी केली. केवळ एवढी मागणी करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी वैष्णवी यांना बोलण्यात गुंतवले. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून वैष्णवी यांचे लक्ष वेधले. वैष्णवी बोलण्यात गुंतल्याचे पाहून यातील दोन महिलांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये अत्यंत चलाखीने काढून घेतले आणि तेथून पसार झाल्या. 


गारमेंट व्यावसायिक असलेले मोहन येलगटी यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून  कपाटात ठेवलेले झुमके, कर्णफुले, चांदीचा कंबरपट्टा अशा दागिन्यांसह दीड लाख रुपयांची रोख रक्कम भरदिवसा घरात घुसून आणि भिकारी असल्याचा बहाणा करीत चार महिलांनी लुटून नेले आहेत. दोघींनी बोलण्यात गुंतवले आणि दोघींनी नजर चुकवत चोरी केली. त्यानंतर चौघीही पसार झाल्या. (Women stole by pretending to be beggars) या घटनेमुळे परिसरातील नागरिक सावध झाले असून आता खरे भिकारी आले तरी नागरिक त्यांच्यापासून दूर राहतील. चोरीचा हा नवा फंडा पाहून नागरीकातून आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. 


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !