BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ ऑग, २०२२

अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे !

 



शोध न्यूज : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याचे संकेत मिळत असून  सिंचन घोटाळ्याचे भूत पुन्हा बाहेर आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 


गेल्या महिन्यापासून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. फोडाफोडीच्या भोवतीच राज्याचे राजकारण फिरत असून कधी नव्हे एवढे राजकीय प्रदूषण झाले असून सामान्य माणूस या 'राजकारणाला' वैतागून गेलें आहे. नवे सरकार स्थापन झाले असले तरी या सरकारवर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार कायम आहे. अशा परिस्थितीतच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. राष्ट्रवादीचा बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचे ट्वीट अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या मोहित कंबोज यांनी केले आणि पुन्हा एकदा राजकारणात धुरळा उडाला आहे. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक, निवृत्त पोलीस अधिकारी संजय पांडे, शिवसेनेचे संजय राऊत आणि आता पाचवा राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे भाजपने सूचित केले आहे. 


पाचवा नेता कोण? याबाबत फारसा संभ्रम निर्माण झाला नाही, हा रोख राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावरच असल्याचे लपून राहिले नाही. यामुळे राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठले आहे. सिंचन घोटाळ्याचे भूत पुन्हा बाहेर काढले जाणार असून अजित पवार यांना अडचणीत आणले जाणार आहे. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना 'दणका' दिल्यानंतर ईडी ने सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडली असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. शिवाय १९९९ ते २००९ या काळातील या कथित सिंचन घोटाळ्याची कागदपत्रे ईडी कडे देण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला असल्याचे देखील समोर येताना दिसत आहे. यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.   


गेल्या काही वर्षांपासून सिंचन घोटाळा राज्यात गाजत असला तरी अलीकडेच या प्रकरणात अजित पवार यांना क्लिनचीट दिली गेली आहे. असे असले तरी उच्च न्यायालयाने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही आणि आता अधिवेशनाच्या तोंडावर या चौकशीची चर्चा सुरु झाली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना क्लिनचीट दिली आहे पण ईडी मात्र या प्रकरणाची पुन्हा चौकशी करणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. (
Ajit Pawar's problems will increase in the irrigation scam case)  यामुळे अजित पवार हे सिंचन घोटाळयाप्रकरणी पुन्हा पेचात पडणार आहेत. 


हे तर षड्यंत्र !
हे तर अजित पवार यांना अडकविण्याचे षड्यंत्र आहे असे राष्ट्रवादीचे नेते सांगत असून या विषयावर शरद पवार यांची काही नेत्यांशी एक बैठक देखील झाली असल्याची चर्चा आहे. ईडी ची कामाची यापूर्वीची पद्धत पहिली तर अजित पवार यांच्यावर हे संकट येवू घातलेले दिसते. राष्ट्रवादीचे दोन महत्वाचे नेते काही महिन्यांपासून अजूनही तुरुंगात आहेत. 


आधीपासूनच तयारी !
अधिवेशनाच्या तोंडावर सिंचन घोटाळ्याचे भूत पुन्हा भीती दाखवू लागले असले तरी हे अचानक घडलेले नसून शिंदे - फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाल्यापासूनच ही तयारी सुरु झाली असल्याचे वृत्त देखील आलेले आहे. ईडी कडून चौकशी सुरु झाली तर राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यासाठी हे निश्चितपणे धोक्याचे मानले जात आहे.      


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !