शोध न्यूज : दुषित पाण्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील विविध गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून विकासाच्या नावाने गप्पा मारणारे नेते पिण्याचे शुद्ध पाणी देखील देवू शकत नसल्याचे समोर आले आहे.
भूजल सर्वेक्षणातून सोलापूर जिल्ह्यातील २४२ गावातील लोक अपायकारक असलेले पाणी पीत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सन २०२१-२२ च्या सर्वेक्षणातून हा धक्कादायक आणि तितकाच चिंताजनक प्रकार प्रकाशात आला आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले असतानाही याबाबत कुणी आवाज उठवताना दिसत नाही. जल विभागाने केलेल्या पाणी नमुना तपासणीत ही बाब समोर आली असून टीडीएस, लोह, पीएच, क्लोराईड, सल्फेट आणि हार्डनेस हे आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील प्रत्येक गावातील पाण्याचे नमुने भूजल विभागाने घेतले होते.
सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून एकूण ९ हजार ६८३ नमुने घेण्यात आले आणि यातील ९०८ नमुने चिंताजनक आढळून आले आहेत. या तपासणीत अत्यंत धक्कादायक बाबी दिसून आल्या असून असे पाणी गावागावातील नागरिक प्राशन करीत आहेत. एकूण २४२ गावातील पाण्याच्या नमुने सदोष आढळून आले आहेत. (Water in Solapur district harmful to health) या पाण्याचा टीडीएस दोन हजाराहून अधिक तर लोहाचे प्रमाणही एक मिलीग्रॅमपेक्षा अधिक आढळून आले आहे. पीएच, अल्कालीनिटी, सल्फेट, क्लोराईड या बाबी देखील क्षमतेपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यातील ४५ गावातील पिण्याच्या पाण्याचे १२० स्त्रोत हेच दुषित आढळून आले आहेत. त्यामुळे तर हा मोठ्या चिंतेचा विषय आहे. मंगळवेढा, करमाळा, माळशिरस आणि सांगोला या तालुक्यातील ही ४५ गावे आहेत. ही गावे जेथील पाणी पिण्यासाठी वापरतात ते स्त्रोतच दुषित आहेत. आमदार समाधान आवताडे हे पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात तब्बल ७० गावे दुषित पाणी पीत आहेत. यात पंढरपूर तालुक्यातील ५३ आणि मंगळवेढा तालुक्यातील १७ गावांचा समावेश आहे. आमदार राम सातपुते यांच्या माळशिरस मतदारसंघात १२ गावे दुषित पाणी पीत आहेत.
आमदार संजय शिंदे यांच्या करमाळा मतदार संघात ९ तर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघातील ७ गावात दुषित पाणी प्यावे लागत आहे. गुवाहाटीत झाडी, डोंगार आणि हॉटेलसुद्धा ओक्के आहे पण येथे सात गावांचे पाणी अजिबात ओक्के नाही. आ. आवताडे हे उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचे तर आ. पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यांच्या मतदार संघातील गावांना दुषित पाणी प्यावे लागत आहे ही दुर्दैवी बाब मानली जात आहे. करमाळा, सांगोला, माळशिरस, मंगळवेढ्यातील ४५ गावे पिण्याच्या शुद्ध पाण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
दुषित पाण्याची गावे
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर, बोराळे, मरवडे, शिरनांदगी, धरमगाव, तामदर्डी, गोणेवाडी, मारापूर, बावची, देगाव, गोणेवाडी, सलगर बु., ढवळस, मल्लेवाडी, मारोळी, नंदेश्वर, रोहितेवाडी तर सांगोला तालुक्यातील जवळा, कडलास, अकोला, बुरंगेवाडी, वाडेगाव, चिणके, लक्ष्मीनगर, माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी, चाकोरे, कुरबावी, मेडद, मिरे, मोटेवाडी, उंबरे दहिगाव, बागेचीवाडी, डोंबाळवाडी, लोंढे-मोहितेवाडी, कदमवाडी आणि करमाळा तालुक्यातील चिखलठाण, जिंती, बाळेवाडी, कविटगाव, कंदर, जिंती, पुणवर, केत्तूर, खडकी या गावांचे पिण्याचे पाणी दुषित आढळून आले आहे.
पंढरपूर तालुका
वाखरी, बिटरगाव, टाकळी गुरसाळे, भंडीशेगाव, भटुंबरे , बोहाळी, चळे, चिलाईवाडी,चिंचोली,भोसे, टाकळी, गोपाळपूर, सुस्ते, तारापूर, फुलचिंचोली, पोहोरगाव, करकंब, गुरसाळे, होळे, जाधववाडी, कौठाळी, खेड भाळवणी, खेड भोसे, सुगाव खुर्द, पिराची कुरोली, पुळूज, पुळूजवाडी, रांझणी, शंकरगाव, शेळवे, शिरढोण, अनवली, अव्हे, बाभूळगाव, बार्डी, उजनी, ओझेवाडी, पटवर्धन कुरोली, पेहे, सिद्धेवाडी, देगाव, देवडे, एकलासपूर, कोंढारकी, कोर्टी, उपरी, विटे,तावशी, तुंगत, मगरवाडी, मुंढेवाडी, नेमतवाडी, या ५३ गावातील पिण्याचे पाणी दुषित आहे.
माढा तालुक्यातील गावे
माढा तालुक्यातील ५१ गावांचा समावेश आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णीसह शेवरे, शिंगेवाडी, सुरळी, तडवळे, टाकळी तांबवे, वेताळवाडी, वडाचीवाडी, वाडोली, वडशिंगे, वरवडे तुळशी, उंडेगाव, उपळवाटे, पिंपळखुंटे, पिंपळनेर, रिधोरे, रोपळे कव्हे, अकोले खुर्द, अकुंभे, आलेगाव बु, बैरागवाडी, बावी, कुर्डू, लोणी, महादेववाडी, महातपूर, मानेगाव, म्हैसगाव, बिटरगाव, चव्हाणवाडी, दहिवली, दारफळ, घोटी, जाधववाडी, निमगाव, पापणस, परिते, परितेवाडी,, रूई, शेडशिंगे, कन्हेरगाव, खवे, केवड, खैराव, खैरेवाडी, कुंभेज, मिटकळवाडी, मोडनिंब, मुंगशी या गावांच्या पाण्याचे नमुने दुषित आढळले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !