शोध न्यूज : एका मंत्री आले पण त्यांच्या कार्यक्रमातील खुर्च्या रिकाम्या पडल्या तर दुसरे एक नेते आधी सत्कार केला नाही म्हणून उठून निघाले अशा दोन घटना शिंदे गटातील मंत्र्यांच्या बाबतीत घडल्या असून याची राज्यभर चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेना फोडून सत्ता स्थापन केलेल्या शिंदे गटाकडून जग जिंकल्याची भाषा केली जात असताना महाराष्ट्रातील वास्तव दाखविणारी बाब समोर आली आहे. शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना सोडून जाणे पसंत केले आणि भाजपशी जवळीक करीत सत्तेवर आरूढ झाले. महाराष्ट्रातील सामान्य जनतेला हे रुचले नाही याची साक्ष देणाऱ्या घटना महाराष्ट्रात घडत असून रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनाच हे चित्र आपल्या डोळ्यांनी पाहावे लागले. शिवसेना फोडल्यामुळे शिवसैनिक संतप्त आणि आक्रमक आहेत पण सामान्य जनता देखील किती नाराज आहे हेच भुमरे यांच्या एका कार्यक्रमातून दिसून आले.
उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना संपविल्याची भाषा शिंदे गट करीत असताना गद्दार आमदारांना पुढची निवडणूक जिंकू दिली जाणार नाही असे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सांगत आहेत. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली असून ते जाईल तेथे प्रचंड गर्दी होत आहे. त्यांची लोकप्रियता अधिक वाढत असल्याचे दिसत आहे. शिंदे गटात मात्र वेगळेच चित्र दिसू लागले आहे. एखादा मंत्री कुठल्याही कार्यक्रमाला जातो तेंव्हा साहजिकच लोकांची गर्दी होत असते. समर्थकासह सामान्य जनता देखील मंत्र्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असते. शिंदे गटातील रोहयो मंत्री संदीपान भुमरे हे मंत्री झाले आणि पहिल्यांदाच पैठण मतदारसंघात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मंत्र्यांचा पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा होती. तशी तयारी देखील करण्यात आली होती पण झाले ते भलतेच ! एकीकडे आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होत असताना शिवसेनेतून बाहेर पडून मंत्री झालेल्या भुमरे यांच्या कार्यक्रमास शंभर ते दीडशे लोक उपस्थित होते आणि समोरच्या खुर्च्या रिकाम्याच पडल्या होत्या. कुणीतरी येईल आणि बसेल याची वाट या खुर्च्या पहात राहिल्या पण कुणी आलेच नाही. पैठण येथील कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाला मात्र प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळाली होती. भुमरे यांच्या सभेकडे मात्र पाठ फिरवली गेली. रिकाम्या खुर्च्या आणि मोजके लोक यांच्यासमोरच भुमरे यांना भाषण द्यावे लागले.
या रिकाम्या खुर्च्यांची महाराष्ट्रात चर्चा होऊ लागली असून भविष्याचे मोठे संकेत मिळून गेले आहेत. रिकाम्या खुर्च्या बरेच काही भविष्य सांगून गेल्या आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तर या रिकाम्या खुर्च्यांचा एक व्हिडीओ जाहीर केला आहे. "भुमरे यांच्या स्वागताला पैठण मधील काही नागरिक आणि खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती' असे दानवे यांनी म्हटले आहे. (Minister's program but the chairs are empty) या सभेने वास्तव समोर आणले असून शिवसेना सोडून नेते शिंदे गटात गेले पण शिवसैनिक मात्र जागेवरच राहिला असल्याचे हे बोलके उदाहरण ठरले आहे. स्वाभाविकच या रिकाम्या खुर्च्या आणि बंडखोर आमदारांचे भवितव्य यावर राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.
आणि 'हे' संतापले !
शिवसेनेतून बंड करून गेलेले आणखी एक आमदार संजय शिरसाट हे मंत्रीपद मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार आधी केला नाही म्हणून ते संतापले आणि कार्यक्रमातून उठून निघाल्याची घटना घडली. औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एक बैठक बोलावली होती. या बैठकीस शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे. शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट, खासदार इम्तियाज जलील हे उपस्थित होते. पोलिसांनी सर्वात आधी शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांचा सत्कार केला आणि आ. शिरसाट यांचा तिळपापड झाला. प्रोटोकॉलनुसार आपल्या अगोदर खैरे यांचा सत्कार करणे चुकीचे आहे असे म्हणत ते उठले आणि कार्यक्रमातून निघून जाऊ लागले. खा. जलील यांनी त्यांना हात पकडून थांबवले !
शिरसाट यांच्यावर टीका !
पोलीस आयुक्तालयाने वयाचा सन्मान म्हणून खैरे यांचा आधी सत्कार केला पण आ. शिरसाट चिडले. हे छायाचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आणि राज्यातून शिरसाट यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील होऊ लागली आहे. या नाराजीनाट्यामुळे कार्यक्रमातही गोंधळ उडाला आणि आता राज्यात पडसाद उमटू लागले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !