BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ ऑग, २०२२

'ईडी' चा राक्षस आता रोहित पवार यांच्या मागे !


 


शोध न्यूज : महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या मागे 'ईडी' लागलेली असताना आता हा राक्षस राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या मागे धावू लागला आहे. 


महाविकास आघाडीतील नेतेमंडळीना केंद्रीय तपास यंत्रणांनी सळो की पळो करून सोडले आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासारखे राष्ट्रवादीचे बडे नेते आजही तुरुंगात आहेत तर शिवसेनेची तोफ असलेले खासदार संजय राऊत हे देखील कोठडीत मुक्कामी आहेत. महाविकास आघाडीतून भारतीय जनता पक्षात गेलेल्या काही नेत्यांच्या मागचा हा ससेमिरा आता शांत झालेला दिसत आहे पण इतर नेत्यांना अजूनही ईडीचा फेरा चुकवता आलेला नाही. नुकतेच अजित पवार यांच्याबाबत ईडी चौकशीचे वादळ उठले असतानाच आता तरुण आमदार रोहित पवार यांच्या मागे हा राक्षस लागू लागला असून यामुळे रोहित पवार यांच्या अडचणी वाढू शकतात असे राजकीय जाणकार सांगू लागले आहेत. 


राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या मागे देखील हे भूत लागले होते पण एकाच दिवसात पवारांनी या भुताला चीतपट केले आणि राज्यात शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती निर्माण झाली होती. बाकी कुठल्याच नेत्याला हे जमले नाही. आता त्यांचेच नातू असलेले तरुण आमदार रोहित पवार हे ईडी च्या रडारवर आले असल्याचे दिसत आहे. आ. रोहित पवार यांच्या ग्रीन एकर या कंपनीची ईडीने चौकशी सुरु केली असून त्यामुळे रोहित पवार अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. ग्रीन एकर रिसोर्टस अँड रिलेटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रोहित पवार हे २००६ पासून २०१२ पर्यंत संचालक होते. त्यांच्यासह एका बँक घोटाळ्यात आरोपी असलेले राकेश वाधवान हे सुद्धा या कंपनीचे संचालक होते आणि आता याच कंपनीची प्राथमिक चौकशी ईडीकडून करण्यात येवू लागली आहे.  


ईडीकडून सुरु झालेल्या या चौकशीमुळे रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. राकेश वाधवान आणि रोहित पवार यांचे निकटचे संबंध असल्याबाबत चौकशी होण्याबाबत एक तक्रार ईडीकडे आलेली होती.  रोहित पवार यांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. पवार यांच्यासह लखविंदर दयालासिंग, धोंडूराम जैदर, अरविंद पटेल यांचीही नावे असून यांच्यापैकी लखविंदर याचे आणि राकेश तसेच सारंग वाधवान यांचे निकटचे संबंध आहेत. वाधवान याच्यासोबत तो विविध कंपनीत भागीदार होता. त्याचे आणि पवार यांचे 'ग्रीन एकर' मुळे संबंध आले आणि याच कंपनीच्या माध्यमातून देशात मोठी रक्कम आली आणि देशाबाहेरही पाठवली गेली. याबाबतच्या चौकशीची ही तक्रार अंमलबजावणी संचालनालयाला प्राप्त झालेली होती.   


'ग्रीन एकर्स' या कंपनीवर कोट्यावधी रुपयांचे व्यवहार लपविले असल्याचे देखील आरोप असून पवार यांनी राकेश वाधवान यांच्यात संबंध आहेत का याचीही तपासणी होणार आहे. यामुळे रोहित पवार यांच्या भविष्यातील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. (NCP MLA Rohit Pawar on ED's radar) पवार कुटुंबातील अजित पवार यांचे नाव ईडी चौकशीसाठी घेतले जाऊ लागले असताना ऐनवेळी रोहित पवारांचे नाव पुढे आले आहे. आ. रोहित पवार हे अलीकडे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांचावर निशाणा साधत असून विद्यमान राजकीय घडामोडींवर ते अत्यंत परखडपणे आणि रोखठोकपणे आपली मते मांडत आहेत. 


भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याबाबत काही दिवसांपूर्वीच सुतोवाच केलेले होते. आता ईडी ने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. राजकीय वर्तुळात या चौकशीने खळबळ उडाली असून तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत. आर्थिक व्यवहाराबाबत अंमलबजावणी संचालनालयाला संशय असून तशा प्रकारची तक्रारही त्यांच्याकडे दाखल झाली आहे. मोठी रक्कम या कंपनीच्या माध्यमातून परदेशी गेल्याची माहिती ईडीकडे असल्याचे सांगण्यात येवू लागले आहे.     


'यांच्या' चौकशीचे काय ?

गेल्या काही वर्षातील कारवाया या पक्षपाती आहेत भाजपात गेले की स्वच्छ केले जाते आणि विरोधात बोलले की अशा कारवाया सुरु होतात असे राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे यांनी म्हटले आहे. २००६ सालचा हा विषय सांगितला जात आहे, त्यावेळी रोहित पवार हे आमदारही नव्हते पण आता त्यांना संशयाच्या भोवऱ्यात अडकविण्यासाठी हे सुरु आहे. भाजप विरोधात बोलले की असे प्रकार होत आहेत. शिंदे गटासह गेलेल्या नेत्यांच्या चौकशीचे पुढे काय झाले ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !