BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० ऑग, २०२२

शौचालयात घेतली लाच, तरी पण पकडलाच !

 


शोध न्यूज : सहाय्यक प्रकल्प अधिकारी पदावर काम करीत असलेल्या एका लाचाखोराने चक्क शौचालयात लाच घेण्याचा पराक्रम करण्याचा प्रयत्न केला पण तेथेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले आहे.


लाचखोर अधिकारी, कर्मचारी सतत पकडले जात आहेत तरीही लाचखोरी वेगाने सुरु आहे. लाच घेताना सापडू नये म्हणून वेगवेगळे फंडे अवलंबले जातात पण लाच घ्यायची सोडली जात नाही. लाच घेताना पकडल्यावर कुणी नोटा तोंडात घालून गिळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करते तर कुणी पळून जाण्याचा प्रयत्न करीत असते. अशा अनेक धम्माल घटनाही याआधी घडलेल्या आहेत. वास्तविक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा तक्रार आल्यापासूनच पुरावे गोळा करीत असतो. लाच मागितली असल्याचा पुरावा मिळाला तरी कारवाई करण्यासाठी पुरेसा असतो. केवळ लाच मागितली तरीही संबंधित लोकसेवकावर गुन्हा दाखल होत असतो. 


लाचखोर नवनव्या युक्त्या करतात पण लाच लुचपत प्रतिबंधक पथकाचे अधिकारी त्यांच्याही पुढे असतात. कितीही युक्त्या वापरल्या तरी लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या जातात. नाशिक येथे तर एका सहाय्यक प्रकल्प अधिकारी असलेल्या लाचखोराने थेट शौचालयात लाच स्वीकारण्याचा मार्ग निवडला. (The officer took the bribe in the toilet) शौचालय त्याला सुरक्षित वाटले, या ठिकाणी पकडले जाणार नाही असा त्यांना कयास होता पण तेथेही तो फसला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. अशा ठिकाणी लाच दिली घेतल्याची यापूर्वीची उदाहरणे नाहीत पण या बहाद्दर अधिकाऱ्याने लाच स्वीकारण्यासाठी हे सुरक्षित ठिकाण निवडले.   


आदिवासी विकास भवन येथे लाचखोर पकडण्याची आणखी एक घटना घडली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी आदिवासी विकास विभागाच्या (Department of Tribal Development) मुख्यालयात कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल याला तब्बल २८ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आदिवासी विभागातच दुसरी घटना घडली असून सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रताप वडजे या लाचखोर अधिकाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले गेले. कार्यालयातील कर्माची महिलेचे पद 'स्वयंपाकी' ऐवजी 'सफाईगार' करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशात बदल करून 'कामाठी' किंवा 'स्वयंपाकी' असे पद करण्याबाबत सदर महिलेने विनंती केली होती. हा आदेश बदलून देण्यासाठी प्रकल्प अधिकारी प्रताप वडजे याने दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.


सदर कर्मचारी महिलेने ही बाब आपल्या पतीला सांगितली आणि महिलेच्या पतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) याबाबत तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा लावून पकडण्याचे नियोजन करण्यात आले. महिलेने काही दगा फटका केला तर लाच (Bribe) प्रकरणात अडकू नये म्हणून या अधिकाऱ्याने युक्ती शोधली आणि शौचालयात लाच घेण्याचे नियोजन केले. कुणाला शंकाही येणार नाही आणि आजूबाजूला कुणी साक्षीदारही असणार नाही त्यामुळे ही जागा सुरक्षित असल्याची त्याची भावना झाली. 


ठरल्याप्रमाणे महिलेच्या पतीने वडजे याच्याशी संपर्क साधून लाच देण्याच्या प्रयत्न केला. शौचालय हे लाच घेण्याचे ठिकाण ठरले असल्याने महिलेच्या पतीने त्या ठिकाणी जाऊन त्याला लाचेची रक्कम दिली. प्रकल्प अधिकाऱ्यास ही जागा अधिक सुरक्षित वाटली पण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक आधीच सज्ज होते. दहा हजार रुपयांची लाच घेताच त्याच्या मुसक्या आवळल्या आणि लाच घेण्याची ही जागा देखील चुकल्याचे या अधिकाऱ्याच्या लक्षात आले.  


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !