शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील लाखो शेतकरी अजूनही ई केवायसी पासून दूरच असून त्यांना सप्टेंबर महिन्यातील सन्मान निधीचा हप्ता मिळणार नसून उद्या ३१ ऑगष्ट पर्यंतच अखेरची मुदत आहे.
केंद्र सरकारने किसान सन्मान निधी योजना सुरु केली परंतु यात अनेक अपात्र व्यक्ती घुसल्या आहेत आणि या योजनेचा फायदा उठवत आहेत. ही बाब संबंधित विभागाच्या लक्षात आल्यानंतर या योजनेसाठी ई केवायसी आवश्यक करण्यात आली असून यामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अनेक अपात्र शेतकरी या योजनेचे पैसे घेत होते असे लोक आढळल्यानंतर त्यांच्याकडून रक्कम वसूल देखील करण्यात येत आहे आणि यापुढे असे घडू नये यासाठी ई केवायसी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे जे शेतकरी ही अट पूर्ण करणार नाहींत त्यांना किसान सन्मान निधी मिळू शकणार नाही. केवायसी करणे अत्यंत साधी प्रक्रिया असूनही शेतकरी यापासून दूर राहिल्याने त्यांना पुढच्या महिन्यातील हप्ता मिळू शकणार नाही.
सोलापूर जिल्ह्यात किसान सन्मान योजनेसाठी ६ लाख ६ हजार ६११ शेतकरी पात्र ठरलेले आहेत पण २ लाख ४८ हजार शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण केली नाही. उद्या दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर संबंधित शेतकऱ्यास सप्टेंबर महिन्यात मिळणारा किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळणार नाही. सदर रक्कम बँक खात्यात जमा होण्यासाठी ई केवायसी बंधनकारक करण्यात आली असल्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपयांचा हप्ता मिळत असतो. (Kisan Samman Yojana, e KYC deadline in final phase) शासकीय नोकर, आयकर भरणारे तसेच या योजनेच्या निकषाप्रमाणे अपात्र असलेले लोक यांनी या योजनेचा फायदा घेतला त्यामुळे केवायसीची अट कडक आणि बंधनकारक करण्यात आली आहे.
सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाच्या मार्फत गावोगावी मेळावे आयोजित करण्यात आले होते तरीही अनेक शेतकरी सहभागी झाले नाहीत. ७ हजार ८७३ शेतकऱ्यांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत आता अंतिम दिवसावर आली असून इ केवायसी न केल्यास सप्टेंबर महिन्यातील हप्ता मिळू शकणार नाही. पंढरपूर, सांगोला, माढा, माळशिरस, करमाळा, बार्शी, अक्कलकोट या तालुक्यातील प्रत्येकी २४ ते ३३ हजार पात्र शेतकरी ई केवायसी पासून दूर आहेत. दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि मंगलावेधास या तालुक्यातील १८ ते १९ हजार शेतकऱ्यांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. उत्तर सोलापूर मधील ८ हजार ४५६ पात्र शेतकरीही यापासून दूर आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ही संख्या मोठी आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एकूण ६ लाख ६ हजार ६११ शेतकरी किसान सन्मान योजनेसाठी पात्र असताना केवळ ३ लाख ५० हजार ७५० शेतकऱ्यांनीच ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. २ लाख ४७ हजार ९८८ शेतकरी अजूनही या प्रक्रियेपासून लांबच आहेत त्यामुळे त्यांचा पुढच्या महिन्यातील दोन हजार रुपयांचा हप्ता मिळू शकणार नाही. हे घडू नये यासाठी आता केवळ एक दिवसाचा अवधी उरला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आजच ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे. www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावर तसेच आपल्या मोबाईलवरून घरबसल्या ही प्रक्रिया करता येते. शिवाय बायोमेट्रिकद्वारे केल्यास केवळ पंधरा रुपये खर्च येतो.
संकेतस्थळ बंद पडले !
ई केवायसी मुदत संपत असतानाच ई केवायसी संकेतस्थळ काल बंद पडले त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली. संबंधित केंद्रावर शेतकरी प्रकीर्या पूर्ण करण्यासाठी थांबले आहेत. अंतिम मुदत असल्यामुळे गर्दी होऊ लागली असतानाच संकेतस्थळ बंद पडल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात मंगळवेढा येथे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !