BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ ऑग, २०२२

सोलापूर जिल्ह्यात चोरी, लातूर जिल्ह्यात विक्री !



शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील मोटार सायकल चोरून लातूर जिल्ह्यात विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. 


मोटार सायकलची चोरी ही एक मोठी समस्या झाली असून घरासमोर लावलेल्या दुचाकी देखील चोरीला जात आहेत. बँकेत अथवा एखाद्या दुकानासमोर मोटार सायकल लावून दहा मिनिटासाठी बाजूला जाऊन परत आल्यावर दुचाकी जागेवर दिसत नाही. राज्याच्या सर्वच भागात अशा प्रकारच्या चोऱ्या होत आहेत. पोलिसांची पथके यावर नियंत्रण आणण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत, दुचाकी चोरांना पकडून त्यांच्याकडून मोठ्या संख्येने चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या जात आहेत पण दुचाकींची चोरी आजीबात थांबत नाही. काही जण तर केवळ मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरी करीत असल्याचे समोर आले आहे. सोलापूर जिल्ह्यात आणि इतरत्र जाऊन दुचाकी चोरी करणारे लातूर पोलिसांनी पकडले आहेत. 


सोलापूर जिल्ह्यासह लातूर, धाराशिव आदी परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लातूर येथील गांधी चौक पोलीस ठाण्याचे विशेष पथक तपास आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. या दरम्यान शाहू चौक परिसरात एका मोटार सायकलवरून दोघे संशयास्पद फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना थांबण्यासाठी इशारा केला पण ते थांबण्याऐवजी पळून जाऊ लागले. त्यांच्या पळून जाण्याने पोलिसांना अधिकच शंका आली आणि त्यांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. अखेर पोलिसांनी रिंग रोड परिसरात पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. (Stolen in Solapur and sold in Latur, two arrested) कळंब तालुक्यातील घारगाव येथील शुभम उर्फ सुग्रीव जरीचंद कुंभकर्ण (सद्या एलआयडी कॉलनी) आणि बीड जिल्ह्यातील रुई धारूर येथील गोपाळ सखाराम माने अशी या आरोपींची नावे आहेत. 


सदर दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याजवळ असलेली मोटार सायकल ही देखील चोरीची असल्याचे आढळून आले. काही दिवसांपूर्वीच ही दुचाकी चोरली असल्याचे त्यांनी कबूल देखील केले. या दुचाकीची चेसीस आणि इंजिन नबंर यांची पडताळणी केली असता ही गाडी चोरी गेल्याचा गुन्हा गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल होता. त्यामुळे त्या गुन्ह्यात या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी सोलापूर, धाराशिव, लातूर अशा विविध भागातून दुचाकी चोरल्याचे सांगितले. 


पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण १३ दुचाकी हस्तगत केल्या विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या १२ आणि ते वापरत असलेली १ अशा ६ लाख ४० हजार रुपये किमतीच्या १३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. चोरलेल्या दुचाकी अत्यंत कमी किमतीत विकणार होते, यासाठी ते वेगवेगळ्या भूलथापा देवून ग्राहकांची फसवणूक करणार होते अशी कबुली देखील या दुचाकी चोरांनी पोलिसांकडे दिली आहे. 


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !