BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ ऑग, २०२२

राज्यातील काही भागात आजपासून पावसाची पुन्हा 'बॅटिंग' !

 




शोध न्यूज : गणपती बाप्पा यावर्षी पावसासोबतच आगमन करणार असल्याचे दिसत असून उद्या आणि परवा दोन्ही दिवस राज्याच्या अनेक भागात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्याच्या अनेक भागात यावर्षी जोरदार पाऊस झाला असून नद्या नाले तुडूंब झाले आहेत. मुसळधार पावसामुळे विविध धरणांच्या पाण्याची पातळी पुरेशी वाढली असल्याने समाधान व्यक्त होत आहे परंतु राज्याच्या अनेक भागात आजही पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाळा परतीच्या प्रवासाला लागू लागला तरी काही भागात अद्याप पुरेसा पाऊस नसल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. सद्या राज्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे परंतु काही ठिकाणी मात्र अजूनही पाऊस सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असून इतर भागातील जोर मात्र ओसरला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, मराठवाडा या परिसरात मात्र आज आणि उद्या पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यासाठी हवामान विभागाने दोन दिवसांचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे दोन दिवस तरी या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे.  राज्यातील काही जिल्ह्यांना हा यलो अलर्ट देण्यात आला असून यात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. (Two days of rain in West Maharashtra from today) उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, औरंगाबाद या जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

सरासरीपेक्षा अधिक पाऊस 

यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. १ जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के जादा पाऊस झाला असून राज्यातील २४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा ६० टक्के अधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. राज्यातील ९ जिल्ह्यात अपेक्षित असा तर ४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाल्याही माहिती हवामान विभागाने दिली आहे. जून महिन्यात पाउस झाला  नाही पण जुलै, ऑगष्ट महिन्यात मात्र जोरदार पाऊस झाला, काही भागात अतिवृष्टी देखील झाली आणि याचा मोठा फटका पिकांना बसला आहे. 

वेळेआधीच परत !

यावर्षी मान्सून पंधरा दिवस आधीच परतीच्या प्रवासाला लागणार असल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून परतीचा प्रवास सुरु करेल अशी हवामान विभागाची माहिती आहे. साधारणपणे मान्सून १७ सप्टेंबर पासून परतीच्या प्रवासाला लागतो आणि ३० सप्टेंबर पर्यंत पूर्णपणे निरोप घेत असतो, यावेळी मात्र पंधरा दिवस आधीच तो निरोप घेण्याची शक्यता हवामान विभाग व्यक्त करीत आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !